स्वयंघोषित सर्पमित्रांमुळे जीव धोक्यात; वाढत्या तस्करीमुळे संकल्पनाच काढली मोडीत

रूपेश खैरी   
Thursday, 15 October 2020

या अनधिकृत सर्पमित्रांना सापांबाबत शास्त्रोक्‍त माहिती नसल्याने त्यांच्याकडून साप हाताळताना हलगर्जी होते. यात प्राण गमविण्याचीही वेळ येते. असाच प्रकार वर्ध्यात घडला. यात दोन सर्पमित्रांना जीव गमवावा लागला. यात सापांबाबत त्यांच्याकडे नसलेली शास्त्रोक्‍त माहिती त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले.

वर्धा  : वनविभागाकडून सर्पमित्रांना ओळखपत्र आणि प्रशिक्षण देण्याचा प्रकार बंद झाल्याने स्वयंघोषित सर्पमित्रांची संख्या वाढली आहे. यातच सापांची नसलेली परिपूर्ण माहिती आणि ते हाताळण्याचे नसलेले शास्त्रोक्‍त ज्ञान यातून दोन सर्पमित्रांना जीव गमवावा लागला. जिल्ह्यातील अधिकृत सर्पमित्रांबाबत वनविभागाला विचारणा केली असता एकही सर्पमित्र अधिकृत नसल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. 

शासनाच्या सूचनेनुसार 2008 मध्ये सर्पमित्रांच्या नोंदी करण्यात आल्या. या नोंदीनुसार 25 सर्पमित्रांना ओळखपत्र देण्यात आले होते. त्याचे प्रत्येक वर्षी त्यांचे नूतनीकरण होणे अपेक्षित होते. पण, तसे झाले नाही. याच काळात काही सर्पमित्र सापांच्या तस्करीत असल्याचे पुढे आले. यामुळे शासनाने सर्पमित्रांची संकल्पनाच मोडीत काढली. परिणामी यातूनच स्वयंघोषित सर्पमित्र पुढे आले.

ठळक बातमी -  मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल

 
या अनधिकृत सर्पमित्रांना सापांबाबत शास्त्रोक्‍त माहिती नसल्याने त्यांच्याकडून साप हाताळताना हलगर्जी होते. यात प्राण गमविण्याचीही वेळ येते. असाच प्रकार वर्ध्यात घडला. यात दोन सर्पमित्रांना जीव गमवावा लागला. यात सापांबाबत त्यांच्याकडे नसलेली शास्त्रोक्‍त माहिती त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले. यामुळे वनविभागाने याकडे लक्ष देत अधिकृत सर्पमित्रांची माहिती सर्वसामान्यांना देण्याची गरज व्यक्‍त होत आहे.  

परीक्षेची सूचना चार वर्षांपासून धूळखात 

शासनाने याच दरम्यान 2016 मध्ये सर्पमित्रांच्या समस्या मार्गी लावण्याकरिता एक समिती गठित करण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनेनुसार जिल्ह्यात समिती गठित करण्यात आली. या समितीने सर्पमित्रांचा अभ्यास करून त्यांच्या अडचणी लक्षात घेत नव्याने ओळखपत्र देण्यासंदर्भात अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर केला होता. या अहवालात ओळखपत्र देताना नोंद असलेल्या सर्पमित्रांची परीक्षा घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आली होती. या प्रकाराला चार वर्षांचा काळ झाला आहे. पण, यावर कुठलीही कारवाई झाली नाही. हा अहवाल वनविभागात धूळ खात आहे. 
 

अनेक सर्पमित्रांची माहिती नाही 

जिल्ह्यात 12 वर्षांपूर्वी 25 सर्पमित्रांची नोंद करण्यात आली होती. त्या काळापासून हे सर्पमित्र कार्यरत आहेत. यापैकी केवळ तीन ते पाच सर्पमित्र सध्या ऍक्‍टिव्ह आहे. त्यांच्याकडून वर्षाकाठी सुमारे सातशे ते आठशे साप पकडण्यात येत असल्याची माहिती सर्पमित्र देत आहेत. 12 वर्षांपासून त्यांच्या कामाचा कुठलाही आलेख वनविभागाकडे नसल्याने यात अनागोंदीची शक्‍यता नाकारता येत नाही. 

सर्पमित्राकरिता आवश्‍यक बाबी

 सर्पमित्र होण्याकरिता पहिले विषारी आणि बिनविषारी सापांचा परिपूर्ण अभ्यास असणे आवश्‍यक आहे. साप पकडण्याची शास्त्रोक्‍त पद्धत आत्मसात करणे, शिवाय त्याला कोणतेही व्यसन नसावे अशा अनेक बाबी सर्पमित्र होण्याकरिता आवश्‍यक आहे. अनेक सर्पमित्रांकडून चुकीच्या पद्धतीने साप पकडण्यात येतो. यात त्यांची होणी होण्याची शक्‍यता अधिक आहे.  
 

शासनाने सूचना दिली नाही
साप पकडताना दोन युवकांच मृत्यू झाल्याची माहिती आहे. परंतु, या संदर्भात वनविभाग काहीच करू शकत नाही. जिल्ह्यात 2008 मध्ये सर्पमित्रांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात आले होते. कुठे साप निघाल्याची माहिती देत त्यांच्याकडून मदत घेतली जाते. सध्या शासनाने सर्पमित्रांसंदर्भात कुठलीही सूचना दिली नाही. नव्याने काही सूचना आल्यास कारवाई करण्यात येईल. 
- सुनील शर्मा
उपवनसंरक्षक, वनविभाग

सर्पमित्रांबाबत घेतलेला निर्णय योग्यच
शासनाने सर्पमित्रांबाबत घेतलेला निर्णय योग्यच आहे. सर्पमित्राच्या ओळखपत्राचा गैरवापर होण्याची शक्‍यता अधिक आहे. यामुळे नागरिकांना सेवा देण्याकरिता वनविभागाने त्यांच्याकडे नव्याने नियुक्‍त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा पोलिसांना साप पकडण्याचे प्रशिक्षण दिल्यास अनेक गैरप्रकाराला आळा बसेल आणि वन्यजीवांचे संरक्षणही होईल. 
- संजय इंगळे तिगावकर 
वन्य जीव अभ्यासक 
 
कुठलीही कारवाई झाली नाही
जिल्ह्यात 2016 मध्ये शासनाच्या आदेशाने समिती गठित करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार सर्पमित्रांची परीक्षा घेण्याचा निर्णय झाला होता. तसा अहवाल वनविभागाकडे सादर करण्यात आला होता. याला तीन वर्षांचा कालावधी झाला असून या संदर्भात कुठलीही कारवाई झाली नाही. 
- आशीष गोस्वामी, 
सचिव, पीपल्स फॉर ऍनिमल. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake Friend Unauthorized exposed death of a young man