गो कोरोना गो! साबणाच्या पाण्याने होतो कोरोनाचा सफाया!

amaravati
amaravati

अमरावती : कोरानावर अजूनही लस सापडलेली नाही. परिणामी कोरोनाचा संसर्गच होऊ नये, यासाठी काळजी घेणे एवढेच सध्या आपल्या हातात आहे. मास्कचा उपयोग करणे, हात वारंवार धुणे, गर्दी टाळणे, ही सगळी काळजी वैयक्‍तिक स्तरावर घेतली पाहिजेच, त्याचबरोबर सार्वजनिक जागांवरील संसर्ग रोखण्यासाठी शासकीय स्तरावर जंतुनाशकाची फवारणी केली जाते.

मात्र चक्‍क साबणाच्या पाण्याच्या फवारणीने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे संशोधन अमरावती येथील रसायनशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापकांनी केले असून राज्य सरकारने त्याची दखल घेत त्याबाबतची माहिती मागितली आहे.
मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष तथा विद्याभारती महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. प्रवीण विधळे यांनी ऑस्ट्रेलियन रसायनशास्त्रज्ञ पॉल थोडरनस यांच्या संशोधनावर आधारित साबणाच्या पाण्याची ही थेअरी मांडली आहे.

बाह्य भागातील कोरोना साबणाच्या पाण्याने नष्ट करता येतो, असे ही थेअरी सांगते. पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या सहकार्याने महापालिकेच्या माध्यमातून कंटेनमेंट झोनमधील शिवनगर या भागात 29 ते 31 मे दरम्यान नागरिकांच्या घरात, भिंतीवर, कंपाउंडच्या आंत आणि रस्त्यांवर साबणाच्या पाण्याची फवारणी करण्यात आली.

दुसरा प्रयोग यवतमाळ बसस्थानकात करण्यात आला. चालक व वाहकांना आवश्‍यक सूचना देण्यात आल्या. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यानंतर त्या भागात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. फक्त साबणाचे पाणी प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात व पद्धतीने वापरावे लागते. हा फॉर्म्युला शास्त्रशुद्ध आहे. त्याची कुठलीही रिऍक्‍शन नाही.

आंघोळीच्या वा डिटर्जंटच्या कुठल्याही साबणाचा यासाठी वापर करता येतो. नाक, तोंड आणि हाताला आंघोळीचे ओले साबण लाऊन आपण घराबाहेर पडू शकतो आणि कोरोनाच्या संसर्गापासून वाचू शकतो, असे डॉ. विधळे यांचे म्हणणे आहे.
एका विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि रसायनशास्त्राचे जाणकार यांचेही या संशोधनात योगदान आहे. स्थानिक पातळीवर प्रयोगाअंती सिद्ध झालेले संशोधन मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव विकास खारगे यांच्याकडे मांडण्यात आले. त्यांनी संशोधनाची कागदपत्रे व निष्कर्षाची निरीक्षणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यास सांगितले आहे.

हायपोक्‍लोराइडच्या फवारणीला जागतिक संघटनेची मनाई
कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी सोडीयम हायपोक्‍लोराइडची फवारणी केली जात आहे. मात्र याला जागतिक आरोग्य संघटनेने मनाई केली आहे. सोडियम हायपोक्‍लोराइडने कोरोना संपुष्टात आला असता तर देशातून तो केव्हाच नाहीसा झाला असता, असे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने यांनी सांगितले.

अहवाल देणार
साबणाच्या पाण्याने कोरोनावर नियंत्रण मिळविता येऊ शकते, या संशोधनाविषयी मागण्यात आलेला अहवाल, त्यासंबंधीची कागदपत्रे आणि प्रयोगातून समोर आलेली निरीक्षणे शासनाला पाठविली जातील. शिवाय शहराच्या काही भागांमध्ये सोडियम हायपोक्‍लोराइडप्रमाणे साबणाच्या पाण्याची फवारणी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com