esakal | महावितरणमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’; वीज ग्राहकांचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

mahavitaran akola.jpg

महावितरणचे सैनिकही कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीत आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडून अखंडित वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे.

महावितरणमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’; वीज ग्राहकांचा पुढाकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : ‘सोशल डिस्टन्सिंग’ चे पालन करत मार्च महिन्यात अकोला परिमंडळातील 1 लाख 66 हजारापेक्षा जास्त वीज ग्राहकांनी आपल्या घरूनच ऑनलाईन वीज बिलांचा भरणा करून महावितरण कार्यालयात येऊन केवळ गर्दी करणेच टाळले नाही तर, स्वतःसोबत इतरांच्याही सुरक्षेची काळजी घेतली आहे.


कोरोना विषाणूच्या प्रसार थांबविण्यासाठी करण्यात आलेल्या संपूर्ण लाॅकडाऊन यशस्वी करण्यासाठी संर्व यंत्रणा एकवटल्या असतांनाच, नागरिकांना आपल्या घरातच थांबता यावे, त्यांना टीव्ही, फॅन, यासारख्या इत्यादी विजेवर चालणाऱ्या साधणांमुळे नागरीकांची गैरसोय होऊ नये तसेच कोरोनाविरुध्दच्या या लढाईत हाॅस्पीटलचा वीज पुरवठा अखंडित रहावा, यासाठी महावितरणचे सैनिकही कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीत आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडून अखंडित वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा - दुदैवच : पोलिसांसाठी शासनाकडे सॅनिटायझर व मास्कचीही तरतूद नाही

महावितरणची वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या लघूदाब वीजग्राहकांची संख्या अकोला परिमंडळात 1 लाख 66 हजार 510 आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील 64 हजार 380 ग्राहकांनी 10 कोटी 25 लाख 17 हजार रुपयांचा भरणा केला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 75 हजार 83 ग्राहकांनी 9 कोटी 36 लाख 24 हजार रूपयांचा तर वाशीम जिल्ह्यातील 27 हजार 47 ग्राहकांनी 3 कोटी 46 लाख 33 हजार रुपयाचा घरबसल्या भरणा करून 21 दिवसीय ‘संपूर्ण लाॅकडाऊन’ यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

क्रेडीट कार्ड वगळता अन्य पर्यायांद्वारे ‘ऑनलाइन’
वीजबिल भरणा निःशुल्क करण्यात आला असून, 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. ऑनलाइन वीज बिल भरण्यासाठी वीज ग्राहकांना महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे वीजबिल भरण्याची सोय करण्यात आली आहे.

ऑनलाइन बिल भरणा झाले निःशुल्क
क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघूदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी ‘ऑनलाइन’चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क करण्यात आले आहे. याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क करण्यात आलेला आहे.

वादळ वाऱ्यामुळे खंडित झालेला वीज पुरवठा झाला सुरळीत
कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे बंद असताना आणि मागील दोन दिवस अवेळी झालेल्या वादळ वारा, पावसामुळे अनेक ठिकाणी खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्यावतीने तत्परतेने प्रयत्न करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

अनावश्यक विजेचा वापर टाळावा
अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण सज्ज आहे. संपूर्ण लॉकडाऊनमुळे घरगुती विजेचा वापर वाढला असल्याने या काळात शेगडी, हिटर, एसी यासारख्या जादा वीज लागणाऱ्या उपकरनांमुळे वीज वाहिन्या अतीभारीत होऊन शॉर्ट सर्किट होणे एखाद्यावेळेस परिसरातील रोहीत्रही निकामे होऊ शकते, या संपूर्ण बंदीत रोहीत्र वेळेवर दुरूस्त करून मिळणे कठीण आहे. त्यामुळे या काळात अनावशक विजेचा वापर टाळावा असे आवाहन अकोला परिमंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

loading image