esakal | Gadchiroli | समाजसेवा ही एक तपस्याच; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari

समाजसेवा ही एक तपस्याच; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - डॉ. बंग दाम्पत्याच्या सर्च संस्थेच्या शोधग्रामापासून देशविदेशात प्रेरणा मिळते. या स्थळी येण्याची, येथील समाजसेवा स्वत:च्या डोळ्यांनी बघण्याची माझी खूप दिवसांची इच्छा होती. दोन वर्षांपूर्वी मी गडचिरोलीमध्ये आलो होतो. परंतु वेळेअभावी येऊ शकलो नाही. जिथे शिकायला मिळते व प्रेरणा मिळते अशा जागी मी जातो. याच हेतूने आज सर्च बघण्यासाठी मी आलो आहे. कारण समाजसेवा ही एक तपस्याच आहे. म्हणून हे समाजसेवेचे एक पवित्र तपस्यास्थळ आहे, असे भावोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.

सोमवार (ता. ११) गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव येथे सर्च संस्थेच्या शोधग्राम या मुख्यालयाला राज्यपाल कोश्यारी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम डॉ. अभय बंग यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. बंग दाम्पत्याने राज्यपालांना आदिवासी परिसरातील विविध समस्यांबाबत व सर्चच्या कार्याबद्दल माहिती दिली.

शोधग्रामध्ये राज्यपाल कोश्यारी यांनी माँ दंतेश्वरी देवीच्या मंदिराला भेट देऊन पूजन केले. आदिवासी दैवतांबाबत माहिती घेतली. तसेच नुकत्याच शस्त्रक्रिया होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांसोबत स्वतः राज्यपाल कोश्यारी यांनी संवाद साधला, उपचार सुविधेबाबत माहिती जाणून घेतली. सर्चच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घरोघरी नवजात बाळाची काळजी, तारुण्यभान (जीवन शिक्षण) कार्यक्रम, निर्माण, आदिवासी आरोग्य, मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती, मुक्तिपथ (दारू व तंबाखू नियंत्रण), कोविड नियंत्रण, पाठ-कंबरदुखी व सांध्यांचे रोग, सांख्यिकी अशा विविध विभागांच्या कामांची माहिती दिली.

हेही वाचा: पुण्याला जमले ते विदर्भाला का नाही? पालकमंत्र्यांची उदासीनता

राज्यपाल कोश्यारी यांना चंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठू नये व गडचिरोली जिल्हा दारूबंदी अधिक मजबूत करण्यात यावी, याकरिता मुक्तिपथद्वारे दोनवेळा निवेदने पाठवण्यात आली होती. याच अनुषंगाने डॉ. अभय बंग यांनी गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या दारू व तंबाखूमुक्तीच्या कामांची राज्यपाल कोश्यारी यांना माहिती देत दारूबंदीच्या धोरणाचा अंतर्भाव असावा, १९७७ मध्ये केंद्र व राज्य शासनाने स्वीकारलेल्या आदिवासींसाठी दारूनीतीची माहिती देत, दारू ही आर्थिक विकासाची नसून व्यसन वाढविणारी आहे, या विविध मुद्यांवर राज्यपाल कोश्यारी यांना माहिती दिली. सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील जनतेचा दारू व तंबाखू सेवनावर २०१५ मध्ये एका वर्षात ३७३ कोटी रुपये खर्च होत होता. सध्यास्थितीत गडचिरोली जिल्ह्यात ११०० गागांत मुक्तिपथचे काम सक्रिय असून, या कामातून जनतेच्या खर्चात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

त्यानंतर वरिष्ठ गांधीवादी नेते स्व. प्रा. ठाकुरदासजी बंग यांच्या समाधिस्थळी राज्यपाल कोश्यारी यांनी पुष्पगुच्छ अर्पण केले. शोधग्राम भेटीनिमित्त उपस्थित कार्यकर्ता समुहासमोर बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील दारू व तंबाखूबंदीचे काम सर्चद्वारा चांगले सुरू आहे. स्थानिक प्रशासन यामध्ये सहकार्य करते का, अशी विचारणा या विषयाची माहिती घेताना त्यांनी केली. कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव संतोष कुमार, नागपूर येथील विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते.

loading image
go to top