अभिनंदनीय! या माणसाच्या सामाजिक कार्याला सलाम, वाईट अनुभव येऊनही उपजिल्हा रुग्णालयाला दिले साहित्य भेट

अहेरी : उपजिल्हा रुग्णालयाला साहित्य देताना तिरुपती बोम्मावार.
अहेरी : उपजिल्हा रुग्णालयाला साहित्य देताना तिरुपती बोम्मावार.

अहेरी (जि. गडचिरोली) : एखाद्याला एखाद्या कार्यालयाचा किंवा एखाद्या ठिकाणी वाईट अनुभव आला, तर तो शिव्यांची लाखोली वाहतो किंवा सूड घेण्याचा प्रयत्न करतो. पण, येथील सामाजिक कार्यकर्ते तिरुपती बोम्मावार यांनी आपल्या पत्नीच्या बाळंतपणाच्या वेळेस उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या वाईट अनुभवाची परतफेड या रुग्णालयाला उत्तम साहित्य व सुविधा देऊन केली आहे. त्यांच्या या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते तिरुपती बोम्मावार यांची पत्नी गर्भवती असल्याने त्यांनी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. पण, येथे त्यांना अतिशय वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. तब्बल पाच तास होऊनही डॉक्‍टरांचा पत्ता नव्हता. त्यांच्या पत्नीच्या वेदना पाहून शेवटी परिचारिकेने संबंधित डॉक्‍टरांशी संपर्क साधला असता "तुम्ही सिझरची तयारी करा, मी पोहचत आहे' असे त्यांनी सांगितले.

डॉक्टरांनी दिली पोलिस तक्रार करण्याची धमकी

पण गर्भवतीला न बघताच सिझरची तयारी करा, असे डॉक्‍टर का म्हणतात हा प्रश्‍न बोम्मावार यांना पडला. काही वेळात दवाखान्यात पोहोचत डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया करून प्रसूती केली. यावेळी बाळ व माता दोघेही स्वस्थ होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा एक रुग्ण आल्याने मातेला व बाळाला चक्‍क खुर्चीत बसायला सांगितले. शस्त्रक्रियेमुळे आधीच पोटाला टाके असल्यामुळे मातेला भयंकर त्रास जाणवू लागला. याबाबत बोम्मावार यांनी संबंधितांना विचारणा केली असता त्यांना पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देत चूप करण्यात आले. काही वेळातच त्यांना नवजात बाळासह चंद्रपूरला रेफर करण्यात आले.


बोम्मावार आपल्या पत्नीसोबत स्वत: दवाखान्यात राहिल्याने त्यांनी दवाखान्यातील गलथान कारभार प्रत्यक्ष बघितला. रुग्णांना व त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीला साधे बसायला स्टूल, टेबल नाही. त्यांनी स्वत:च्या घरून खुर्ची नेली होती व त्याच खुर्चीत त्यांचे एक दिवसाचे बाळ व पत्नीला बसायला लावले. जर त्यांनी खुर्ची नेली नसती तर खाली बसविले असते का, असा प्रश्‍न बोम्मावार यांना पडला.

रुग्णालयाचा वाईट अनुभव

बसायला खुर्ची नाही, शौचालय व बाथरूममध्ये घाणच घाण, सफाई कामगारांना सफाईसाठी आवश्‍यक साहित्य नाहीत, जे आहेत ते अपुरे आहेत. कचरा टाकण्यासाठी डस्टबिन नाहीत, पाय पुसणे नाहीत. हे सर्व बोम्मावार यांनी स्वत: बघितले. त्यांना स्वत:ला रुग्णालयाचा वाईट अनुभव आला असतानाही अतिशय उदार अंत:करणाने त्यांनी स्टूल, लहान-मोठे डस्टबीन, पाय पुसण्या व इतर आवश्‍यक साहित्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांच्याकडे सुपूर्द केले.

मूलभूत सुविधांची वानवा

दरम्यान दवाखान्यातील गैरसोयीबाबतची माहिती बोम्मावार यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना दिली असता त्यांनी स्वत: पाहणी करून आवश्‍यक सूचना दिल्या. सरकार आरोग्यसेवेवर कोट्यवधी रुपये खर्च करते. पण लोकांना मूलभूत सुविधा का मिळत नाही, हा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.


समस्या सोडविण्याची गरज
मी अहेरी येथील स्थानिक रहिवासी असल्याने उपजिल्हा रुग्णालयात मला जाणवलेल्या सर्व समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. मला इतके वाईट अनुभव आले, तर अहेरी उपविभागात लांब अंतरावरून येत असलेल्या गरीब लोकांचे कसे हाल होत असतील? माझ्यासारख्या सुशिक्षिताला अशाप्रकारे वागणूक मिळत असेल; तर गोरगरीब व आदिवासी बांधवाची काय स्थिती असेल? याचा विचार येताच अंगावर शहारा येतो. या समस्या सोडविण्याची नितांत आवश्‍यकता आहे.
- तिरुपती बोम्मावार, सामाजिक कार्यकर्ते, अहेरी.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com