कोरोनाच्या वादळात सॉफ्टवेअर कंपन्याही ठप्प!

software
software
Updated on

चंद्रपूर : नवीन योजना असो वा नवा उद्योग, त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार केले जाते. मागील काही वर्षांपासून हा व्यवसाय चांगलाच तेजीत होता. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांनी आपले जाळे पसरवित कामे सुरू केली. मात्र, मार्च महिन्यात कोरोनाची एन्ट्री झाली आणि या कंपन्यांची कामे ठप्प पडली. आर्थिक मंदीमुळे नवीन खासगी कामे सुरू झाली नाही, तर, दुसरीकडे शासनाने बजेटचे कारण पुढे करीत नवीन योजनांना ब्रेक लावला. त्यामुळे आता या कंपन्या पूर्णपणे "सॉफ्ट' झाल्या आहेत. परिणामी कोट्यवधींच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे.
चंद्रपूर औद्योगिकदृष्ट्या संपन्न जिल्हा आहे. वेकोलिच्या कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, एमईएल यासोबत गेल्या काही वर्षांत या भागात मोठ्या प्रमाणावर उद्योग आले. संगणकीय युग असल्याने उद्योगांची बहुतांश कामे आता त्यातूनच होत आहेत. खासकरून सॉफ्टवेअरचा मोठा उपयोग विविध खासगी कंपन्या आपल्या कामात करतात. ऑनलाइन कामांनाही गेल्या काही वर्षांत महत्त्व प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यात जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प आहे. देशविदेशातील पर्यटक येथे वाघांना बघण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी करतात. पर्यटकांची वाढती संख्या पाहून या भागात मोठे-मोठे हॉटेल, रिसोर्ट तयार झाले आहे. हॉटेल, रिसोर्टमालक आपल्या हॉटेलची माहिती देण्यासाठी सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. सोबतच हॉटेल्स, मोठे बिल्डर्स, जीम हे घटकही आपली माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता सॉफ्टवेअरचाच उपयोग करतात.
गेल्या काही वर्षांत शासनाने सॉफ्टवेअरला महत्त्व दिले आहे.राज्य शासनाची विविध कार्यालये सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच आपापली कामे करतात.
सॉफ्टवेअर, ऑनलाइन नोंदणीची कामे मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जिल्ह्यात सॉफ्टवेअर कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर जाळे तयार झाले. चंद्रपूर शहरातच दहा ते पंधरा कंपन्या आहेत. या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे.
या कंपन्या सॉफ्टवेअर तयार करून देण्यासाठी मोठे पैसे आकारतात. या कंपन्यांची महिन्याकाठीची उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहेत. मार्च महिन्यात कोरोना विषाणूने हातपाय पसरले. देशभरात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका सर्वच घटकांना बसला. त्यातून सॉफ्टवेअरचे हे क्षेत्र सुटले नाही.
उद्योग बंद पडले. पर्यटन, हॉटेल्स, मोठ-मोठ्या बिल्डर्सचा साइट बंद पडल्या. त्याचा मोठा फटका या सॉफ्टवेअर कंपन्यांना बसला आहे.
सॉफ्टवेअर, ऑनलाइनची कामे जवळपास तीन महिन्यांपासून बंदच पडली आहेत. कामे नसल्याने या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी काही दिवस घरीच काढले. आता मात्र कोणतीच काम नसल्याने तेही हातावर हात देऊन बसले आहेत. कर्मचारी जरी घरी असले तरी कंपन्यांना त्यांना वेतन द्यावे लागत आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने विविध खर्चांना मोठी कात्री लावली आहे. त्यामुळे विविध कार्यालयांकडून नियमितपणे होणारी सॉफ्टवेअरची कामे बंद पडली आहेत. विविध कार्यालयातून निघणाऱ्या सॉफ्टवेअरच्या निविदाही बंद आहेत. सॉफ्टवेअर कंपन्यांची देयके विविध कार्यालयांकडून सध्या थकीत आहेत. कोरोनाचे संकट दूर होऊन कामकाज नियमित होण्याची अपेक्षा कंपन्या बाळगून आहेत.
इंडस्ट्रीयल ट्रेनिंगही प्रभावित
उन्हाळ्याच्या सुट्ट्यात विविध सॉफ्टवेअर कंपन्या अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल ट्रेनिंग घेत होते. या ट्रेनिंगला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. मोठी रक्कम यातून कंपन्यांना मिळत होती. मात्र, कोरोना विषाणूमुळे इंडस्ट्रीयल ट्रेनिंगही प्रभावित झाले आहे. सध्या ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण सुरू आहे. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

कंपन्या आर्थिक अडचणीत
कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. लॉकडाउनचा मोठा फटका सॉफ्टवेअर, ऑनलाइनची कामे करणाऱ्या कंपन्यांना बसला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सर्वच कामे बंद पडली आहे. आर्थिक अडचणीला कंपन्यांना तोंड द्यावे लागत आहे.
श्रद्धा सपाट- बुराण
संचालिका, स्वाफ्टग्रोथ इन्फोटेक कंपनी चंद्रपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com