esakal | वा रे पठ्ठे...पाल टाकून उभारली विद्यार्थ्यांसाठी शाळा; आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने घेतली दखल, आता... 
sakal

बोलून बातमी शोधा

Software Engineer young man started school for students in the village

तुमसर तालुक्‍यातील दावेझरी 300 लोकसंख्येचे गाव. विकासाचे प्रात्यक्षिक गावकऱ्यांना अद्यापही फारसे माहिती नाही. शिक्षणाचीही अवस्था काहीशी डबघाईला आलेली. शिक्षणाबद्दल लोकांमध्ये फारशी जागरुकताही नव्हती. परंतु जयला हे चित्र बदलायचे होते.

वा रे पठ्ठे...पाल टाकून उभारली विद्यार्थ्यांसाठी शाळा; आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने घेतली दखल, आता... 

sakal_logo
By
रेवननाथ गाढवे

देव्हाडा (जि. भंडारा) : मोठ्या शहरात मोठे शिक्षण घेतलेल्या तरुणांची स्वप्नेही मोठीच असतात. आपण घेतलेल्या मेहनतीचे चिज व्हावे, या उद्देशाने बड्या पगाराच्या नोकरीमागे सारेच धावत असतात. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या तरुणांची धाव पुण्या-मुंबईकडेच असते. परंतु आपल्या मातीचे उपकार मानून जिथे जन्मलो, वाढलो, संस्कारित झालो तेथील नागरिकांचे आपण काही देणे लागतो या भावनेने काम करणारे कमीच असतात. नागपूरच्या नामांकित महाविद्यालयातून सॉफ्टवेअर अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेतलेल्या जयला मोठी शहरे कधीच खुणावत नव्हती. त्याला गावाचीच धरायची होती. तेथील नागरिकांसाठी काहीतरी करायचे या एकाच जिद्दीपोटी जय कामाला लागला. 

तुमसर तालुक्‍यातील दावेझरी 300 लोकसंख्येचे गाव. विकासाचे प्रात्यक्षिक गावकऱ्यांना अद्यापही फारसे माहिती नाही. शिक्षणाचीही अवस्था काहीशी डबघाईला आलेली. शिक्षणाबद्दल लोकांमध्ये फारशी जागरुकताही नव्हती. परंतु जयला हे चित्र बदलायचे होते. नागपूरच्या गायकवाड पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून सॉफ्टवेअर अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या जयने महानगरात मोठ्या पगाराची नोकरी मिळविण्यापेक्षा गावात राहून समाजासाठी काम करायचे ठरवले. 

हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य
 

गावातील शिक्षणाची अशी बिकट अवस्था पाहून त्याचे मन कळवळून आले. शासन, प्रशासन कुणीच लक्ष देत नसल्याने गावाचा विकास खुंटला असल्याने भावी पिढी शिक्षणापासून दूर जात असल्याचे त्याच्या लक्षात आले. अशा या गावातील मुलांसाठी काहीतरी करायची जिद्द त्याने आपल्या मनाशी धरली. जिद्द, चिकाटीच्या जोरावर गावातील एका रिकाम्या जागेवर झोपडी तयार केली. सिमेंटच्या पोत्यांचे आच्छादन घालून त्यात गावातील विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. 

गावातील गोरगरिबांची मुले तेथे शिक्षणासाठी येऊ लागली. मात्र, उच्चशिक्षित तरुण काय वेडेपणा करतो, असे मन सुरुवातीला गावकऱ्यांनी त्याची हेटाळणी केली. मात्र तो खचला नाही. गावातील विरोधाला समोर जात त्याने त्याचे कार्य सुरूच ठेवले. आता त्याने या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचेही वर्ग घेणे सुरू केले आहे. रात्रपाळीची शाळाही सुरू केली. 

ही त्याची जिद्द पाहून लोक त्याच्या मदतीला धावून आले. एक एक शैक्षणिक साहित्य गोळा होऊन तुमसर तालुक्‍यातील दावेझरी (आ) येथे ज्ञानयज्ञ सुरू आहे. शिक्षणाचे पवित्र काम करून तो या गावातील तरुणांच्या मनात स्पर्धा परीक्षेबद्दल ऊर्मी जगृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने एक एक करीत आता तेथे असंख्य पुस्तके जमा झाली, याच विश्‍वासावर तो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करीत आहे. एका उच्चशिक्षित ध्येयवेड्या तरुणामुळे गावातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 

जयच्या कार्याचे झाले ग्लोबली कौतुक 

जय मोरेच्या या कार्याची दखल स्पेनच्या ट्रान्सकॉन्टिनेंटल टाइम्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसमूहाने घेतली आहे. ट्रान्सकॉन्टिनेंटल टाइम्सने जयच्या या कार्याविषयी इंग्रजीत "Humanitarian Saw Spark In Young Children Of Dawezari" या शीर्षकाचा वापर केला. 

कार्य पुढे सुरूच राहणार 
मी आजपर्यंत करत आलेल्या या पवित्र कार्याचे मला आज फळ मिळाले. स्पेनच्या ट्रान्सकॉन्टिनेंटल टाइम्स या वर्तमानपत्रात बातमी लागली आणि मला फार आनंद झाला. हे कार्य मी पुढेह असेच चालू ठेवीन. 
-जय. एन. मोरे

 
संपादित : अतुल मांगे 

loading image
go to top