व्हिडिओ) लॉकडाऊनमधील वेळेचा हिमांशूकडून सदुपयोग, साकारली ही अप्रतीम कलाकृती 

Solar cycle made by Himanshu of Brahmanwada
Solar cycle made by Himanshu of Brahmanwada

मांगलादेवी (जि. यवतमाळ) : येथून जवळच असलेल्या नेर तालुक्‍यातील ब्राह्मणवाडा (पूर्व) गावातील "रॅंचों'ने आपला छंद जोपासत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ निर्मिती केली. त्याने अत्यल्प खर्चात "सोलर सायकल' तयार केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हिमांशू ब्राह्मणवाडा पूर्व येथील शेतकरी सुनील विठ्ठल घावडे यांचा मुलगा. लहानपणापासूनच हिमांशूला इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंसोबत खेळण्याचा छंद. त्याचे प्राथमिक शिक्षण नेर येथील खाजगी शाळेत पूर्ण झाले. हिमांशूला पाचवीत असताना तालुकास्तरीय उत्कृष्ट मॉडेल निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी त्याने टाकाऊ वस्तूपासून "पेरणी यंत्र' बनविले होते. त्यावेळी तो केवळ दहा वर्षांचा होता. हिमांशू सतत कोणत्या ना कोणत्या प्रयोगात गुंतलेला असतो. 

सध्या हिमांशू सतरा वर्षांचा असून, शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथे प्रथम वर्षाला शिकतो. कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यामुळे शैक्षणिक सत्र बंद झाले. हिमांशूने मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत घरीच असलेल्या टाकाऊ वस्तू जमा करण्यास सुरुवात केली. बालपणी वडिलांनी घेऊन दिलेली तीन चाकी सायकल भंगारात पडून होती. तिचे पार्ट वेगळे करणे, घरातील वस्तू ज्या योग्य वाटतील त्या एकत्र करणे, घरातील फवारणी पंपाची बारा व्होल्टची बॅटरी, जुन्या सायकलचे एक्‍सल, घरातील प्लायवूड यापासून सोलर सायकल साकारणे सुरू केले. 

जमा केलेल्या वस्तू जोडणे त्याने सुरू केले. प्रसंगी इलेक्‍ट्रिकल वस्तूंची कमी पडत असताना वडिलांकडे मागणी करून त्या मागून घेतल्या. वडिलांनाही मुलाचा छंद जोपासत हव्या त्या वस्तू पुरवल्या. काही दिवसांत हिमांशूने सोलर सायकल साकारली. सर्व वस्तू घरच्याच असल्याने, सायकल निर्मितीला अत्यल्प खर्च आला. परंतु याच वस्तू विकत घेऊन सायकल निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास, अंदाजे पाच ते साडेपाच हजार रुपये खर्च येऊ शकतो. 
हिमांशूकडे सोलर पॅनलवर लागणारे घरगुती लाईट आहेत. त्यामुळे बारा होल्टची बॅटरी चार्ज होण्यास केवळ 45 मिनिटे लागतात. तसेच बॅटरी पंधरा किलोमीटरपर्यंत चालते. 


हिमांशूने तयार केलेली सायकल ताशी तीस ते पस्तीस किलोमीटर वेगाने धावू शकते, असा विश्वास त्याने व्यक्त केला. निर्मित सायकलची बॅटरी बारा होल्ट असल्याने पंधरा किलोमीटरपर्यंत चालते. बॅटरी सोलर पॅनलवर चार्ज होते. त्यामुळे कोणताही इंधन खर्च नाही व प्रदूषणही होत नाही. असा हा टाकाऊ वस्तूपासून निर्माण केलेल्या टिकाऊ अशा "सोलर सायकल" निर्मितीचा प्रवास. हिमांशूने तयार केलेल्या सायकलीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
 
 

छंदापासून कधीही दूर केले नाही
हिमांशू लहानपणापासूनच इलेक्‍ट्रिकल वस्तूशी खेळणारा होता. यात्रेतून आणलेल्या छोट्या गाड्या तसेच इतर वस्तूंसोबत काही वेळ खेळल्यानंतर मोडतोड करून त्याचा जोडधंदा करण्याचा त्याला छंद आहे. आम्हीसुद्धा त्याला त्याच्या या छंदापासून कधीही दूर केले नाही. त्याने टाकाऊ वस्तूंपासून निर्माण केलेली सोलर सायकल पाहून आमचा आनंद द्विगुणित झाला. 
सुनील व मंगला घावडे, हिमांशूचे आई-वडील, रा. ब्राह्मणवाडा (पूर्व )ता. नेर  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com