
मुलगा पाण्यात बुडू लागल्याचे पाहून बापाने मुलाचा जीव वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी त्वरीत पोलिसांना कळविले.
वडकी (जि. यवतमाळ): गुरे चारायला गेलेल्या पितापुत्राचा एका खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. वडकी तालुक्यातील खैरी गावाजवळ नाल्यालगत शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एकाचवेळी बापलेकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - अशोक चव्हाण कडाडले; तुम्ही सरकार पाडून दाखवा, आम्ही महाविकासआघाडीची ताकद दाखवू
अजाब तनसुजी वानखेडे (वय ४५), असे पित्याचे, तर गणेश अजाब वानखेडे (वय १३), असे मृत मुलाचे नाव आहे. कोसारा रस्त्यालगत भिंगे घाटाच्या पुलाजवळ मुरुमाचे खोदकाम केले आहे. त्यामुळे त्याठिकाणी भला मोठ्ठा खड्डा पडला आहे. याठिकाणी गणेश गुरे चारत होता. त्यावेळी त्याचा तोल गेल्याने तो खड्ड्यात पडला. मुलगा पाण्यात बुडू लागल्याचे पाहून बापाने मुलाचा जीव वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी त्वरीत पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. एकाचवेळी बापलेकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.