Son in law : ‘या’ गावात केला जातो जावयांचा सार्वजनिक सत्कार; वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जावयांचा सार्वजनिक सत्कार

‘या’ गावात केला जातो जावयांचा सार्वजनिक सत्कार; वाचा सविस्तर

निलज बु. (जि. भंडारा) : ‘जावई बुवा हात पाय धुवा’ ग्रामीण भागात प्रचलित असलेल्या झाडीबोलीतील म्हणीप्रमाणे जावयांचा मान व सत्कार हा फक्त त्याच्या सासऱ्याच्या घरी अथवा नातेवाइकांच्या घरी होतो. परंतु, भंडारा जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये जावई सत्काराचा कार्यक्रम सार्वजनिकरीत्या आयोजित केला जातो. त्यापैकीच मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द या गावी जावयांचा सत्कार हा गावातील सार्वजनिक मंचावर केला जातो.

स्व. युवराज शेंडे स्मृती प्रतिष्ठान व सार्वजनिक नाट्य कला निकेतन खुर्दतर्फे जावायांचा सत्कार सोहळा व विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवारी करण्यात आले. दीड दशकांपासून सुरू असलेला हा सोहळा यंदा विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण देऊन करण्यात आला. दिवाळीच्या निमित्ताने गावात पाचवीच्या मंडईचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने जावई सत्कार सोहळा आटोपून जावयांच्या व पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी झाडीपट्टी संगीत तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. जावयांना सत्कारासाठी मंचावर बोलविण्यात आले होते. ही अनोखी परंपरा पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. यावेळी गावातील पोलिस विभागात कार्यरत असलेले तरुण ज्ञानेश्वर भोयर यांनी जावयांना विशेष भेटवस्तूही दिल्या.

हेही वाचा: २३ कोटींच्या विम्यासाठी त्यांनी गमावले दोन्ही पाय, मात्र...

नवीन जावयांचा सत्कार

गावात वर्षभरात नवीन लग्न झालेल्या सर्वच जावयांचा सत्कार यानिमित्ताने करण्यात येतो. सोहळ्याचे यंदाचे पंधरावे वर्ष होते. या निमित्ताने जावयांना विशेष निमंत्रणही दिले जाते. हा कार्यक्रम नाट्य मंडळाच्या व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येतो.

तालुक्यात जावयांचा सत्कार करणारा निलज खुर्द हा एकमेव गाव आहे. गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष प्रस्ताव मांडून सत्काराचा कार्यक्रम नाट्य मंडळाच्या वतीने न घेता ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात यावा.
- संजय कावळे, सरपंच, ग्रा. प. करडी

हेही वाचा: एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा खून

माझ्यासोबत १० नवीन जावयांचा सत्कार करण्यात आला. गावातील ही परंपरा अत्यंत छान आहे. ही परंपरा यानंतरही अशीच सुरू राहील हीच आशा बाळगतो.
- प्रणय मते, जावई
loading image
go to top