जावई-सासऱ्याने दारूच्या नशेत उकरून काढला जुना वाद अन्‌ मग घडले असे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

बल्लारपूर तालुक्‍यातील आसेगावात रविवारी देवपूजा करण्यात आली. या सोहळ्यात नागरिकांसह जावई-सासरे सहभागी झाले. मनसोक्त दारूच्या नशेत मग दोघांचे जेवणही आटोपले आणि त्यानंतर विपरीतच घडले.

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : गावात पूजा झाली. बकऱ्याचे जेवणही झाले. सोबत जावई चुलत सासरे दोघांनीही मस्त "दारू'ही ढोसली. त्यानंतर मद्याच्या नशेतच संपत्तीचा जुना वाद उफाळून आला. शाब्दिक वाद हाणामारीवर आला. यात जावयाने चुलत सासऱ्याला जबर मारहाण केली.

मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. सुकरू वाघू सिडाम (वय 70) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकास विठोबा मडावी याला ताब्यात घेतले आहे. ही घटना तालुक्‍यातील आसेगाव येथे घडली.
 

आसेगावात देवपूजा

बल्लारपूर तालुक्‍यातील आसेगावात सात जून रोजी रात्री पूजा झाली. नेहमीप्रमाणे जावई विकास विठोबा मडावी आणि चुलत सासरे सुकरू वाघू सिडाम यांनी आधी मद्य आणि त्यानंतर मटणावर ताव मारला. दोघेही भरपूर प्याले होते. यातून दोघांत घरालगत असलेल्या जागेचा वाद उफाळून आला.

रुग्णालयात मृत्यू

अवघ्या काही क्षणात या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. जावई विकास मडावी याने गोटे आणि लाठी काठीने 70 वर्षीय सासरे सुकरू सिडाम यांच्यावर हल्ला चढविला. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना सात जून रोजी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी (ता. 8) उपचार घेणाऱ्या सासऱ्याचा मृत्यू झाला.

जाणून घ्या : का आली लाखो लीटरची दूध विक्री अर्ध्यावर?

गावात स्मशान शांतता

घटनेनंतर नेहमी वर्दळ असणाऱ्या गावात स्मशान शांतता पसरली आहे. घटनेतील आरोपी जावई विकास विठोबा मडावी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिवलाल भगत, एपीआय बोदके आणि जोशी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son-in-law killed his father-in-law in Chandrapur