का केला "त्याने' पोटच्या मुलाचा खून... वाचा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

बल्लारपूर येथील एका मुलाचा बापानेच खून केल्याची घटना शनिवारी (ता. 7) सकाळच्या दरम्यान घडली. व्यसनी मुलाचा त्रास असह्य झाल्याने पित्यानेच हे टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे शहरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीने घटनेनंतर शस्त्रासह स्वतःला पोलिसांच्या हवाली करून खुनाची कबुली दिली आहे.

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : राग अनावर झालेल्या बापाने हातोडीने डोक्‍यावर प्रहार करून पोटच्या मुलाचाच खून केल्याची घटना शनिवारी (ता. 7) सकाळी 10 वाजताच्या दरम्यान विद्यानगर वॉर्डत घडली. राहुल सोपान नगराळे (वय 42), असे खून झालेल्या मुलाचे तर सोपान नगराळे (वय 72) असे हल्लेखोर पित्याचे नाव आहे.

आरोपीने घटनेनंतर शस्त्रासह स्वत: पोलिस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. राहुलला दारूचे मोठे व्यसन होते. मद्युधंद अवस्थेत तो कुटुंबीयांशी नेहमीच वाद घालायचा. मात्र शनिवारी वडिलांचा संयम सुटला आणि ही घटना घडली.

राहुलला दारूचे व्यसन

दारूच्या आहारी गेलेल्या मुलाच्या त्रासामुळे मानसिकरीत्या खचलेल्या बापाने आपल्या पोटच्या मुलाला ठार केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. बल्लारपूर पेपरमिलमध्ये "फिटर' पदावर कार्यरत राहुलला दारूचे व्यसन होते. तो मागील काही महिन्यांपासून पूर्णत: दारूच्या आहारी गेला होता. कामावर येत नव्हता. त्यामुळे पेपर मिल व्यवस्थापनाने त्याला बडतर्फ केले होते. तो दारू पिल्यानंतर कुटुंबीयांशी वाद करायचा. त्याच्या या व्यसनामुळे घरातील सदस्य मानसिकदृष्टया त्रस्त होते.

शाब्दिक वाद झाला अन्‌ घडली घटना

नेहमीप्रमाणे शुक्रवारलाही सकाळी राहुल मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने पित्याशी शाब्दिक वाद घातला. यावेळी मात्र वडिलांचा संयम सुटला. सोपानने रागाच्या भरात हातोडीने राहुलच्या डोक्‍यावर जोरदार प्रहार केला. त्याचक्षणी राहुल रक्तबंबाळ अवस्थेत कोळसला आणि गतप्राण झाला. राहुलची पत्नी एका खासगी शाळेत शिकवते.

विदर्भात पहिल्यांदाच होतोय इज्तेमा उत्सव.... वाचा याबद्दल

आई घरगुती कामात व्यस्त

घटनेच्यावेळी पत्नी घरी नव्हती; तर आई घरगुती कामात व्यस्त होती. घटनेनंतर वडील सोपान नगराळे यांनी स्वत: पोलिस ठाणे गाठले आणि गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son murder at ballarpur