
अमरावती शहरातील फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत पोहराबंदी गावात बुधवारी (ता. 22) रात्री ही घटना घडली. उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास गंभीर जखमी मारोतराव चंपतराव पाचबुद्धे (वय 70, रा. पोहरा बंदी) यांचा मृत्यू झाला.
अमरावती : लग्नानंतर नवीन मुलगी घरी आली की तिला रुळण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. घरातील चालीरिती, कुटुंबीयांच्या सवयी, शिस्त हे सारे शिकताना तिच्याकडून काही चुका होतातही. अशावेळी कुटुंबीय आणि तिनेही स्वत: समजूतदारीची भूमिका घेणे गरजेचे असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पतीने तिला समजून घेणे गरजेचे असते. परंतु पती-पत्नीमध्येच कुरबुरी होत असतील त्या संसाराला ग्रहण लागण्यास वेळ लागत नाही. अशाच एका प्रकारणात नवऱ्यासोबत झालेल्या वादातून पत्नी मुलासह वर्षभरापासून माहेरी निघून गेली. वडिलांनी तिची समजूत घालून तिला घरी आणावे अशी तिच्या पतीची इच्छा होती. परंतु मुलाचे वागणे योग्य नसल्याने पुन्हा तोच प्रकार घडेल, या विचारातून वडील पुढाकार घेण्यास तयार नव्हते. हाच राग त्याच्या मनात होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत पोहराबंदी गावात बुधवारी (ता. 22) रात्री ही घटना घडली. उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास गंभीर जखमी मारोतराव चंपतराव पाचबुद्धे (वय 70, रा. पोहरा बंदी) यांचा मृत्यू झाला. मृताची पत्नी पार्वती मारोतराव पाचबुद्धे (वय 65) यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा ठाण्यात मुलगा राजू पाचबुद्धे (वय 40) याच्यविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला मध्यरात्रीच अटक केली, असे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - "त्याला' बुडताना पाहून मित्र गेले पळून, नंतर सायंकाळी घडले असे...
राजू हा पत्नी व मुलासह गावातच शेजारी वेगळा राहत होता. लहानसहान कारणावरून पती पत्नीमध्ये भांडण व्हायचे. त्याच्या या स्वभावामुळे वर्षभरापासून त्याची पत्नी त्याला सोडून मुलासह माहेरी निघून गेली. तेव्हापासून तो एकटाच राहत होता. बुधवारी (ता. 22) रात्री साडेसातच्या सुमारास राजूने वडिलांच्या घरी जाऊन माहेरी गेलेल्या पत्नीसह मुलास परत घेऊन या, याकरिता वृद्ध पित्याकडे तगादा लावला. वडील ऐकत नसल्याचे बघून तो संतापला. त्याने आईवडिलांसोबत वाद घातला. त्यांना शिवीगाळ केली व घरातील धारदार शस्त्राने वडील मारोतराव यांच्या डोक्यावर, पायावर व मानेवर सपासप वार केले. वृद्ध आईने आरडाओरड केल्यानंतर लोक घरासमोर जमले. ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले.
फ्रेजरपुरा पोलिसांनी मुलाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी मारोतराव पाचबुद्धे यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु मुलाने धारदार शस्त्राने वार केल्याने शरीरातून बराच रक्तस्राव झाला होता. उपचारादरम्यान मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास पित्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी मुलगा राजू पाचबुद्धेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला रात्रीच अटक केली.
संपादित : अतुल मांगे