सोयाबीनला सोन्याचे दिवस, भाव 4 हजार 200 वर

विनोद इंगोले
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

दररोजची सरासरी आवक आठ हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची आहे. जिल्ह्यात चार प्रक्रिया उद्योजक आहेत. त्यांच्या मार्फतही बाजारातून थेट सोयाबीनची खरेदी होते. त्यामुळे दरात तेजी येत 3725 ते 4210 रुपये क्‍विंटलवर दर पोहोचले आहेत.

नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसल्याने यावर्षी सोयाबीनची उत्पादकता प्रभावित झाली आहे. देशाअंतर्गत प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने राज्यात पहिल्यांदाच सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर गेले आहेत. 3,710 रुपये क्‍विंटलचा हमीभाव असलेल्या सोयाबीनचे 4,200 रुपये क्‍विंटलने व्यवहार होत आहेत.

विदर्भात वाशीम जिल्हा सोयाबीनचे हब म्हणून ओळखला जातो. कापूस शेतीला सोडचिठ्ठी देत या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पर्याय गेल्या काही वर्षांपासून अवलंबिला आहे. वाशीम जिल्ह्याच्या कारंजा बाजार समितीत सद्या:स्थितीत सोयाबीनची मोठी आवक होत आहे. दररोजची सरासरी आवक आठ हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची आहे. जिल्ह्यात चार प्रक्रिया उद्योजक आहेत. त्यांच्या मार्फतही बाजारातून थेट सोयाबीनची खरेदी होते. त्यामुळे दरात तेजी येत 3725 ते 4210 रुपये क्‍विंटलवर दर पोहोचले आहेत.

उघडून तर बघा - सकाळ संध्याकाळ वाघाचे वॉक

गेल्यावर्षी नागपूरच्या कळमना बाजार समितीत सोयाबीनचे दर अवघे 3000 ते 3200 रुपये होते. यावर्षी मात्र सोयाबीन दरांनी हमीभावालाही मागे टाकले आहे. मे, जून महिन्यात सोयाबीनचे दर पाच हजारांवर जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादन पावसामुळे अर्ध्यावर आले आहे. त्या ठिकाणच्या प्रक्रिया उद्योजकांची गरजही यातून भागविली जाऊ शकत नाही. त्यासोबतच पुढील हंगामासाठी लागणाऱ्या बियाण्याचादेखील प्रश्‍न निर्माण होणार असल्याने मध्यप्रदेशातून सोयाबीनला वाढती मागणी आहे. त्याचाही महाराष्ट्रातील दरावर परिणाम झाल्याचे जाणकार सांगतात.

दर पाच हजारावर पोहोचतील
कापसाचे दर तेजीत असल्याने या हंगामात कापसाचा पेरा वाढला. या कारणामुळे आधीच सोयाबीन क्षेत्र कमी झाले होते. लागवड झालेल्या क्षेत्राला पावसाचा फटका बसला आणि धामणगाव बाजारातील आवक चार ते पाच हजार पोत्यांची आवक राहत होती, आता ती अवघी दोन हजार पोत्यांवर आली आहे. त्यामुळे मे, जून महिन्यात सोयाबीनचे दर पाच हजारावर पोहोचतील, अशी अपेक्षा आहे.
- मनीष केला,
व्यापारी, धामणगाव रेल्वे, जि. अमरावती

यंदा आवक मर्यादित
पावसामुळे राज्यात सोयाबीन हंगाम प्रभावित झाला आहे. त्यामुळेच आमच्या आष्टा बाजार समितीची आवक हंगामात 14 हजार पोत्यांची राहते. यावर्षी ही आवक तीन ते चार हजार पोत्यांपुरती मर्यादित झाली आहे. मध्य प्रदेशात सोयाबीन प्रक्रिया उद्योजकांकडून 4,300 रुपयांचा दर दिला जात आहे. इतरांकडून 4,200 रुपयाने सोयाबीन खरेदी होत आहे. बियाणे कमी असल्याने सोयाबीनचे 4,300 ते 4,500 दर आहेत.
- तरुण जैन (वेदमुथा),
सदस्य, सोयाबीन प्रक्रिया संघटना, आष्टा, जि. सिहोर, मध्यप्रदेश.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soyabean :prices at 4 thousand 200