सोयाबीनच्या दरात वाढ, कापसाच्या दरात घट | Soybean and Cotton | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

soybean and cotton

सोयाबीनच्या दरात वाढ, कापसाच्या दरात घट

यवतमाळ - महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ व ‘सीसीआय’ने यंदा एकही केंद्र सुरू केलेले नाही. खासगीत कापसाला चांगले दर असल्याने शेतकर्‍यांची पसंती खासगीला आहे. दिवाळीपूर्वी सतत वाढणारे कापसाचे दर खाली येत आहेत. दुसरीकडे सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ दिसत आहे. कापूस व सोयाबीनच्या विक्रीत शेतकर्‍यांनाच फटका बसत आहे.

जिल्ह्यातील शेतकरी यंदा अनेक अडचणीत सापडले आहेत. कमी पाऊस, परतीच्या पावसाचे तांडव, सोयाबीनचे घटलेले उत्पन्न, काही ठिकाणी बोंडअळीचे झालेले आक्रमण अशा अडचणीत शेतकरी आहेत. अशातच पावसाचा काही प्रमाणात कापूस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला. मॉईश्‍चरमुळे भाव पाडले जात आहेत. त्याचा फटकाही शेतकर्‍यांनाच बसत आहे. दिवाळीपूर्वी कापसाचे दर बाजारात चांगले वाढत होते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. कापसाचा दर आठ हजार सहाशे रुपयांवर गेला होता. दिवाळीनंतर कापसाच्या दरात दररोज शंभर रुपये घट होत आहे. सध्या कापसाचा दर सात हजार चारशे रुपयांवर आला आहे. बाजारात कापसाची आवक वाढली आहे. शेतकर्‍यांनी रब्बीच्या तयारीसाठी कापूस विक्रीला आणला आहे. दर चांगले मिळतील, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती.

हेही वाचा: मोबाईल दिला नाही म्हणून वडीलांचे फोडले डोके

मात्र, दरात घट झाल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच येत आहे. याउलट सोयाबीनची स्थिती आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीनच्या दरात घट झाली होती. आता हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीला आणल्यानंतर दर पडले होते. व्यापार्‍यांच्या ताब्यात सोयाबीन गेल्यानंतर आता सोयाबीन दर वाढायला सुरुवात झाली आहे. दररोज सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. सध्या सोयाबीनचे दर पाच हजारांवर गेले आहे. सोयाबीन शेतकर्‍यांनी जवळपास विकले आहे. त्यानंतर आता दर वाढत आहेत. कापूस शेतकर्‍यांच्या घरात येत असून, कापसाच्या दरात घट होत आहे. या परिस्थितीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. आधीच अतिवृष्टीने आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी आता दर पडल्याने कोंडीत पाडले आहेत.

बाजार समित्यांत तीन लाख क्विंटलची खरेदी

जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांत आतापर्यंत 85 हजार 419 शेतकर्‍यांनी दोन लाख 72 हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी केली. त्यात 22 हजार 536 शेतकर्‍यांनी दोन लाख 75 हजार 493 क्विंटल कापसाची विक्री केली आहे. एक लाख 46 हजार 440 क्विंटल तुरीची खरेदी बाजार समित्यांत झाली आहे, तर 28 हजार शेतकर्‍यांनी हरभराची विक्री केली आहे.

loading image
go to top