Video : शेतकऱ्यांची फसवणुक! उगवलीच नाहीत सोयाबीनची बियाणे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सोयाबीन बियाणे उगवली नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींनाही माहिती दिली. मात्र, याकडे कोणीही गांभीर्याने बघितले नाही.

यवतमाळ : जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार प्राप्त होताच किसान कॉंग्रेसचे विदर्भ अध्यक्ष, शेतकरी नेते देवानंद पवार यांनी शुक्रवारी (ता. 19) तालुक्‍यातील कारेगाव व घाटंजी तालुक्‍यातील राजूरवाडी येथील शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांना महाबीज या सरकारी कंपनीसह इतरही कंपन्यांची सोयाबीन बियाणे उगवली नसल्याचे यावेळी शेतकऱ्याने सांगितले. त्यांच्यासोबत शेतकरी नेते अशोक भुतडा, हिरालाल राठोड व शेतकरी दीपक जाधव (कारेगाव) व गजानन पाथोडे (राजुरवाडी) व इतर शेतकरीही उपस्थित होते.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सोयाबीन बियाणे उगवली नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींनाही माहिती दिली. मात्र, याकडे कोणीही गांभीर्याने बघितले नाही. देवानंद पवार यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी कारेगाव व राजूरवाडी येथील शेतशिवार गाठून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यावेळी त्यांना 80 ते 90 टक्के महाबीजचे बियाणे उगवले नसल्याचे लक्षात आले. याबाबत बोलताना देवानंद पवार म्हणाले की, सरकारी कंपनी असलेल्या महाबीजचे बियाणे देखील 80 ते 90 टक्के उगवले नाही. ही बाब फार गंभीर आहे.

शेतकऱ्यांनी मला व्हाट्‌सऍपवरून तक्रारी केल्या. त्यामुळे मी तातडीने लक्ष घातले. इगल, अंकुर, महाबीज किंवा सारसचे बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याचेही पवार यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटात बनावट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचे ते म्हणाले. याबाबत आपण कृषी आयुक्तालयाशी बोललो. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे.

ज्या कंपन्यांनी बनावट बियाणे पुरविले त्यांना सील करण्यात यावे, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे, तसेच बियाणे प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी, शिल्लक असलेला बियाणे साठा ताब्यात घेण्यात यावा व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे देवानंद पवार यांनी याभेटीदरम्यान सांगितले.
सविस्तर वाचा - नागपुरात कोरोना सुसाट
शेतकऱ्यांना आलेल्या बियाणे, पेरणीसाठी लागलेला खर्च, मजुरीचा सर्व खर्च दिला गेला पाहिजे. जर, या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, हा शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आहे. कोणताही सावकार दारात उभे करायला तयार नाही. बॅंका कर्ज देत नाहीत. कर्जमाफीचा पैसा आला नाही. अशा सर्व संकटाच्या काळात जगाचा पोशिंदा शेती कसतो आहे. त्याला बनावट बियाणे देऊन फसविले जात असेल तर ही बेईमानी कदापि खपवून घेणार नाही. याबाबत आपण विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले व कृषीमंत्री दादा भुसे यांना आजच माहिती देणार आहोत. तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soybean seeds did not germinate