दोन महिन्यांनंतर धावली लालपरी, मात्र वाया गेली तिची फेरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

अंजनगावसुर्जी बसस्थानकातसुद्धा तब्बल दोन महिन्यांनंतर लालपरीचे दर्शन झाले. परंतु आलेल्या बसेस रिकाम्याच होत्या व रिकाम्याच निघून गेल्या. परतवाडा येथून सकाळी आठ वाजता येथील बसस्थानकात पहिली बस आली. परंतु एकही प्रवासी या बसमध्ये नव्हता.

अमरावती : कोरोनामुळे लॉकडाउन सुरू असताना ग्रामीण जनजीवन सामान्य व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या आदेशानुसार चांदूरबाजार आगारातून शुक्रवारी (ता. 22) सकाळपासून बसेस सोडण्यात आल्या. मात्र, आगारामधून सकाळी निघालेल्या 3 बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. त्यामुळे परतवाड्याला जाणारी बस कुरळपूर्णा येथून परतली. 

शुक्रवारी चांदूरबाजार आगारामधून सकाळी 11 वाजेपर्यंत 3 बस सोडण्यात आल्या. त्यात चांदूरबाजार- परतवाडा, चांदूर बाजार- वलगाव व चांदूर बाजार- तिवसा या मार्गाचे नियोजन होते. या बस आगारामधून निघताना तिन्ही बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. त्यामुळे परतवाडा येथे जाणारी बस कुरळपूर्णा येथूनच वापस बोलावण्यात आली. नेरपर्यंत गेलेल्या बसमध्ये सुद्धा जाताना व येताना एकही प्रवासी मिळाला नाही. नेहमी प्रवाशांनी भरगच्च राहात असलेल्या आगारामध्ये शुक्रवारी कोरोनामुळे प्रवासी नव्हते, तर कर्मचाऱ्यांची गर्दी दिसून येत होती. गावातील नागरिक एसटी बस खरोखरच सुरू झाल्या का, हे बघण्यासाठी स्थानकावर येत होते. ग्रामीण भागात देखील बस सुरू झाल्याची माहिती नव्हती. त्यात पहिल्या दिवशी चालक-वाहकांना सॅनिटायझर, मास्क अशा आवश्‍यक सुविधा आगाराकडून उपलब्ध करून दिला नसल्याची कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये होती. 

अवश्य वाचा- केवळ शंभर रुपये द्या आणि प्रवासासाठी ई-पास घ्या, कुठे आणि कुणी सुरू केला हा धंदा?

सध्या लग्नसराई सुरू असून कोरोनामुळे लग्न समारंभामध्ये गर्दी होऊ नये यासाठी नियम करण्यात आले आहेत. त्यामुळे वर-वधू मंडळी खासगी गाडीचा उपयोग करीत आहेत. मागील वर्षी याच महिन्यात लग्नसराईमुळे या आगाराला लाखो रुपयांचे उत्पन्न झाले होते. पण आज या कोरोनामुळे या आगाराचे उत्पन्न शून्य झाले आहे. 

अंजनगावसुर्जी बसस्थानकातसुद्धा तब्बल दोन महिन्यांनंतर लालपरीचे दर्शन झाले. परंतु आलेल्या बसेस रिकाम्याच होत्या व रिकाम्याच निघून गेल्या. परतवाडा येथून सकाळी आठ वाजता येथील बसस्थानकात पहिली बस आली. परंतु एकही प्रवासी या बसमध्ये नव्हता. जाताना सुद्धा कोणी प्रवासी बसमध्ये बसला नाही. त्यानंतर दर्यापूर आगारातून सुद्धा बस आली, परंतु तिचीही अवस्था तशीच होती. शासनाच्या आदेशानुसार राज्य परिवहनची बससेवा सुरू करण्यात आली. पहिला दिवस असल्याने लोकांना माहिती नसल्याने प्रवासी आले नसल्याचे वाहतूक नियंत्रक कासमपुरे यांनी सांगितले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST bus started from Friday, but not a single passenger in it