निराधारांच्या मानधनाला ‘ब्रेक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Gandhi Niradhar Yojana

निराधारांच्या मानधनाला ‘ब्रेक’

अमरावती : राज्य शासनाकडून निराधारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनाच आता निराधार बनल्यात की काय, अशी शंका येते. मागील चार ते पाच महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे मानधनच मिळालेले नसल्याची बाब समोर आली आहे.

वृद्ध, निराधार, दिव्यांग तसेच दुर्धर आजारी व्यक्तींना शासनाकडून संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून मासिक मानधन देण्यात येते. या माध्यमातून निराधारांना काहीसा आधार मिळत असतो, मात्र मागील तीन ते चार महिन्यांपासून निराधार योजनांचे मानधनच प्राप्त झाले नसल्याने निराधारांची परवड होत असल्याचे चित्र दिसून येते.

राज्यात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंतर आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय स्थगित ठेवण्यात आले होते, मात्र त्याचा फटका आता योजनांनाही बसला. निराधारांसाठी अतिशय महत्त्वाची अशा श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेचे मासिक मानधन केवळ एक हजार रुपये आहे.

आजच्या महागाईच्या काळात हे मानधन तुटपुंजे आहे. विशेष म्हणजे तुटपुंजे मानधनसुद्धा तीन ते चार महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप हेल्पिंग हॅण्डस या स्वयंसेवी संघटनेने केला आहे.

महागाईची तीव्रता पाहता हे मानधन किमान तीन ते चार हजार रुपये असावे, अशी मागणी शासनाकडे सातत्याने केली जात असली तरी शासनाकडून अपेक्षेप्रमाणे त्याला प्रतिसाद मिळत नसल्याची भावना अनेक निराधारांनी व्यक्त केली. यासंदर्भात हेल्पिंग हॅण्डच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

मागील वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मागील वर्षी चार ते पाच महिन्यांचे मानधन रखडले होते, मात्र सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ते मिळाले. यंदासुद्धा अशीच परिस्थिती दिसून येते. त्यामुळे शासनाने आता याकडे लक्ष दिले पाहिजे.

-भूषण दलाल, पदाधिकारी, हेल्पिंग हॅण्डस, अमरावती.