वर्ग पाचवा प्राथमिकला जोडण्याचा निर्णय आरटीईनुसारच, रद्द केल्यास छेडणार तीव्र आंदोलन

सुधीर भारती
Sunday, 27 September 2020

माध्यमिक शाळा 5 ते 10 असल्यास त्याठिकाणी संचमान्यता करणे शासनाला कठीण जात असून त्याठिकाणी वर्ग आठवीसाठी एक स्वतंत्र शिक्षक मान्य करावा लागतो. आरटीईनुसार विषय शिक्षक उपलब्ध होत नाही.

अमरावती : माध्यमिक शाळेतील इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय आरटीईमधील तरतुदींनुसार घेण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या वतीने शासनाकडे करण्यात आली.

सदर आदेश निर्गमित झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील बंद पडत असलेले इयत्ता पाचवीचे वर्ग पुन्हा नव्याने सुरू होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राथमिक शाळेतील वर्ग 1 ते 4 च्या वर्गास पाचवा वर्ग आणि उच्च प्राथमिक शाळेत 1 ते 7 च्या शाळांना आठवीचे वर्ग जोडण्याची प्रक्रिया मागील चार वर्षांपासून अनेक जिल्हा परिषदांमध्ये सुरू आहे.

हेही वाचा -  नि:शुल्क उपचाराची मागणी; शुल्कासाठी परवानगी, भाजपचे...

केवळ ठरावीक ठिकाणी एकाच परिसरात पाचवी आणि आठवी दोन किंवा अधिक शाळांमध्ये आहे. माध्यमिक शाळा 5 ते 10 असल्यास त्याठिकाणी संचमान्यता करणे शासनाला कठीण जात असून त्याठिकाणी वर्ग आठवीसाठी एक स्वतंत्र शिक्षक मान्य करावा लागतो. आरटीईनुसार विषय शिक्षक उपलब्ध होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शाळांना 5 वा तसेच 8 वा वर्ग जोडणे अधिक संयुक्तिक आहे, असे मत उमेश गोदे यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा - 'आरक्षण द्या अन्यथा मंत्र्यांच्या घरात सोडू मेंढरे'; मागणी मान्य होण्यासाठी धनगर समाज...

शासनाने सर्वंकष बाबींचा विचार करून माध्यमिक शाळांतील इयत्ता पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय रद्द करू नये. तसेच रद्द केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष उमेश गोदे, सरचिटणीस अनिल पलांडे आदींसह पदाधिकाऱ्यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state graduate primary teachers demand to remain decision of link class fifth to primary class