राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र बालनाट्य स्पर्धा

सोमवार, 13 ऑगस्ट 2018

राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र बालनाट्य स्पर्धा
नागपूर : दिव्यांग कलावंतांसाठी राज्यात स्वतंत्र बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक विभागाने सादर केला आहे. सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी नाट्य संमलेनातील भाषणात याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार विभागाने प्रस्ताव तयार केला असून याच वर्षीपासून या स्पर्धेचा श्रीगणेशा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. राज्यातील एकूण पाच केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी होते आणि प्रत्येक केंद्रावर दोन ते तीन नाटके दिव्यांग विभागातून सादर होतात. या कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असा विचार करून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या सरकारच्या विविध विभागांकडे हा प्रस्ताव परवानगीसाठी गेला आहे. राज्यभरातील दिव्यांग कलावंतांना त्यांच्या भागातील केंद्रावरच सादरीकरण करता येईल आणि त्यातून सर्वोत्तम नाटकाला विजेता घोषित करण्यात येईल, असे नियोजन असल्याचे कळते.
राज्यभरात दिव्यांगांच्या जवळपास एक हजार शाळा आहेत. नागपूर विभागात 74 शाळा आहेत. यातील अगदी बोटावर मोजण्याएवढ्या शाळाच स्पर्धेत सहभागी होतात. या विद्यार्थ्यांच्या सहभागाचे प्रमाण वाढावे आणि त्यांच्यातून उत्तम रंगकर्मी घडावे, असा यामागचा उद्देश आहे. विशेष म्हणजे स्वतंत्र स्पर्धा होणार असली तरीही ज्या संस्थांना मुख्य स्पर्धेत प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध असणार आहे, असेही कळते. यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक संजीव पालांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
स्पर्धा केंद्रही वाढणार
बालनाट्य स्पर्धा सध्या आठ शहरांमध्ये होत असली तरी केंद्र केवळ पाचच आहेत. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात संपूर्ण राज्यातील बालकलावंत स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत. शिवाय कोकण आणि मुंबई, पुणे आणि कोल्हापूर, नागपूर आणि अमरावती, नाशिक-जळगाव यांचे प्रत्येकी एकच केंद्र असल्यामुळे तीस ते चाळीस नाटकांमधून दोनच नाटकांना अंतिममध्ये जाण्याची संधी मिळते. त्यामुळे पाचऐवजी दहा स्वतंत्र केंद्र करण्याचा प्रस्ताव विभागाने सादर केला आहे. असे झाल्यास बालनाट्य स्पर्धेचा खर्च 35 लाख रुपयांनी वाढेल. हा प्रस्ताव अद्याप संमत न झाल्याने यंदा बालनाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका एक महिना उशिराने उपलब्ध होणार आहेत.

Web Title: state handicap Children's theater Competition