कबड्डीच्या पंढरीत रंगणार राज्यस्तरीय आमदार चषक; सिने कलावंतासह मंत्र्यांची मांदीयाळी

kabaddi.jpg
kabaddi.jpg

अकोला : कबड्डीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या केळीवेळी राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धा 27 ते 29 मार्चला रंगणार असून, या स्पर्धेकरिता राज्यातील नामवंत असे पुरूषांचे 24 तर महिलांचे 16 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेकरिता महिला व पुरूषांकरिता स्वतंत्र असे 50 पारीतोषिकांने खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार असून, याकरिता राज्यातील कॅबीनेट व राज्यमंत्र्यासह सिनेकलावंताचीही हजेरी राहणार असल्याची माहिती शनिवारी (ता.29) आयोजित पत्रकार परिषदेत कबड्डी मंडळाचे संयोजक माजी आमदार गजाननराव दाळू गुरुजी यांनी दिली.

यावर्षीचा राज्यस्तरीय कबड्डी महोत्सव लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर, उद्योजक स्व. राधाकिसन व स्व. अंगुरीदेवी बाजोरिया, मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू स्व. पुंडलीकराव अवचार, स्व. संजय हिवरे गुरुजी, यांच्या स्मृतीला समर्पित आहे. केळीवेळीत 27 मार्चपासून प्रारंभ होणाऱ्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेकरिता केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर, क्रीडा मंत्री सुनिल केदार, जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू आदींसह जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांची उपस्थिती लाभणार आहे. 

नामवंत सिने कलावंतांची हजेरी
यासोबतच मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत सिने कलावंत हजेरी लावणार आहेत. स्पर्धेत पुरुष गटात प्रथम विजेत्या संघाला 71 हजार व चषक, द्वितीय विजेत्या संघाला ५१ हजार व चषक, तृतीय विजेत्या संघाला 31 हजार व चषक तर महिला गटात प्रथम विजेत्या संघाला 51 हजार व चषक, द्वितीय विजेत्या संघाला ३१ हजार व चषक, तृतीय विजेत्या संघाला 21 हजार व चषक देवून सन्मानित करण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ट चढाईपटू, बचावपटू, सामनावीर, मालिकावीर असे विविध प्रकारचे 50 बक्षीसे ठेवण्यात आले आहेत. 

आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा केळीवेळी 2020
स्पर्धा आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या पुढाकाराने होत असल्याने स्पर्धेचे आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा केळीवेळी 2020 असे नामकरण करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड, डॉ. जगन्नाथ ढोणे, मंडळाचे अध्यक्ष गजानन मोंढे, ज्ञानदेवराव परनाटे, माधवराव बकाल व मंडळाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

देशपातळीवर मिळविला नावलैकिक
हनुमान क्रीडा प्रसारक मंडळ व बहुउद्देशीय संस्थेची स्थापना 1942 ला करण्यात आली असून, केळीवेळी कबड्डीचे हे 78 वे वर्ष आहे. मंडळाच्यावतीने सातत्याने 14 वेळा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. स्पर्धेत राज्यातील विविध भागातून कबड्डीचे खेळाडू केळीवेळीत दाखल होतात. ही स्पर्धा कबड्डी प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. केळीवेळी गावाने क्रीडा क्षेत्रात कबड्डीमुळे आपले नावलौकिक केले आहे. यासोबत देश गौरवासाठी देश-विदेशात आपले खेळाडू पाठविले आहेत.

आमदारांना खराब रस्त्यांची चिंता
अकोला- अकोट रस्त्याची झालेली दयनिय अवस्था पाहता आमदार गोपीकिशन बाजोरीया यांनी येणाऱ्या मंत्री महोदय पाहुण्यांना खराब रस्त्याची आधी माहिती देईल आणि तरीही या कबड्डी स्पर्धेसाठी या अशी विनंतीही करेल. अशी मिश्‍कील टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com