कमाल करते हो मॅनेजर साब..लो करते है फिर "ठिय्या' 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

एका ऑफिसमध्ये नोटीस लागली. "सर्वच कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती आवश्‍यक आहे. सोमवारपासून हजेरी लावा.' त्यावेळी कुणी चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी होते. तर कुणी गडचिरोली जिल्ह्यातील आपल्या वेगवगेळ्या गावी. ही नोटीस बघताच धडाधड मोबाइलवरून निरोप गेले. तब्बल 380 कर्मचारी कशीबशी व्यवस्था करून कार्यालयात पोहोचले. तर तिथे मॅनेजरने तोंडी आदेश दिले. "लॉकडाउनपर्यंत कामावर येऊ नका. आपआपल्या घरी जा.' मग मात्र कर्मचारी भडकले. त्यांनी आंदोलनाचे अस्त्र पुकारले. 

गडचिरोली : नोटीस बोर्डवर भलताच आदेश आणि तोंडी भलताच आदेश दिल्यामुळे काय करावे आणि काय करू नये, अशी अवस्था कर्मचाऱ्यांची झाली. कर्मचारी मॅनेजरला म्हणाले, ""साहेब, आम्ही काय करावे तो लेखी आदेश द्या. मग तुम्ही म्हणाल ते आम्ही करू.'' परंतु, यावर मॅनेजर साहेबांनी ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे अखेर कर्मचारी "ठिय्या' आंदोलनाला बसले. 

ही घटना आहे सोमवारची. स्थळ गडचिरोली राज्य परिवहन विभागाचे आगार. अर्थात एसटी बस आगार. गडचिरोली आगारातून जिल्ह्यात सध्या "एसटी' बसच्या दोनच फेऱ्याच सुरू आहेत. पंधरा दिवस उलटूनही प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच शासनाने एका आदेशाव्दारे सोमवारपासून म्हणजे आठ जूनपासून कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य केली. 

हे ही मजेदार..वाचा - अमरावतीत या पद्धतीने होणार भाजीपाला विक्री... जाणून घ्या

या आदेशानुसार गडचिरोली येथील आगार व्यवस्थापकांनी नोटीस बोर्डवर चालक व वाहकांना उपस्थित राहण्याबाबत लेखी आदेश काढले. सकाळी आठ ते दहा या वेळात कर्मचाऱ्यांनी आगारात हजर राहून दैनंदिन रजीस्टरवर सह्या कराव्यात, उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरहजेरी लावण्यात येईल, असेही बजावले होते. 

आगार व्यवस्थापकांच्या आदेशानंतर सोमवारी गडचिरोली आगारातील 196 चालक आणि 184 वाहक सकाळीच कार्यालयात हजर झाले. मात्र, त्यांना पुन्हा लॉकडाउनपर्यंत कामावर न येण्याच्या तोंडी सूचना आगर व्यवस्थापकांनी दिल्या. त्यामुळे ते संतप्त झाले. "आम्ही काय करायचे हा लेखी आदेश द्या', अशी मागणी त्यांनी केली. व्यवस्थापक ऐकत नाही असे दिसताच त्यांनी बसस्थानक परिसरातच "ठिय्या' आंदोलन सुरू केले. 

नाहीच हटणार आम्ही 

"जोवर लेखी पत्र मिळणार नाही, तोवर हटणार नाही', अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने अधिकारी अडचणीत सापडले. कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम होते. 

संघटानाही आल्या मदतीला 

राज्य परिवहन विभागाच्या गडचिरोली आगारात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनी प्रशासनाकडून "ई-पास' काढून 
आपल्या मुख्यालयात हजेरी लावली होती. त्यानंतर आगार व्यवस्थापकांच्या कार्यालासमोर कर्मचाऱ्यांनी गर्दी केली. त्यामुळे सुरक्षित अंतराचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कर्मचाऱ्यांना नाहक ञास सहन करावा लागला, असा आरोप महाराष्ट्र "एसटी' कामगार सेना प्रमुख गजानन नागोसे, कॉस्ट्रॉइब संघटनेचे दीपक मांडवे, नीतेश मडावी यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Transport employees started agitation against Depot manager