
यवतमाळ : केळीचे सुकले बाग असूनी निगराणी रे, कवी अनिलांच्या कवितेतील केळी बागेप्रमाणेच खरोखरच केळीची बाग उजाड झाली आहे, मात्र वादळामुळे. मका व केळी विकून सोसायटी, बँकेचे कर्ज फेडणार होतो. कोरोनाने भाव पडले अन् वादळाने केळी पडली. त्यामुळे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. आता कर्ज कसे फेडावे व खरीप हंगामाची तजवीज कशी करावी, असा प्रश्न उभा ठाकला आहे. आता शासनानेच मदत करावी, अशी मागणी तीन एकरातील केळी व मका पिकाचे नुकसान झालेल्या गजानन मनोहर पोटे या शेतकर्याने केली आहे. वादळामुळे झालेले नुकसान दाखविताना अक्षरश: त्यांच्या डोळ्यांत पाणी येत होते.
यवतमाळ तालुक्यातील वडगाव जंगल येथे मनोहर पोटे यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्यांचे चिरंजीव गजानन पोटे हे शेती बघतात. त्यांच्या कुटुंबात 40 एकर शेती आहे. त्यापैकी दहा एकर ओलित आहे. त्यात त्यांनी केळी, मका, भुईमुग व कांदा लावला. यंदा कोरोनामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले. शेतमालाचे भाव पडले. तर मजुरांना दामदुप्पट मजुरी द्यावी लागत आहे. त्यात अस्मानी संकट त्यांच्या पाचविलाच पुजलेले असते. रविवार (ता. दहा), सोमवार (ता. 11) या दोन दिवशी वादळी वार्यासह जोराचा पाऊस आला. यामुळे केळी पार झोपली. केळीचे घड जमिनीवर पडले. पाने फाटली. त्यामुळे केळीचे मोठे नुकसान झाले. कोरोनामुळे केळीची भाव पडले. चार रुपये किलोने केळी विकावी लागत आहे. वादळाने मोठे नुकसान झाले केले. लॉकडाउनमुळे मका बाजारात नेताच आला नाही. त्यामुळे त्यांचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कांदा व भुईमुगावर भिस्त होती. परंतु ते बाजारात नेऊन विकणे शक्य नाही. त्यामुळे गजानन पोटे यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यावर आयसीआयसीआय बँकेचे साडेसहा लाख व सोसायटीचे अडीच लाख रुपये कर्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. कच्चे केळं ते गुरांना चारत आहेत. खरीप हंगामाची तजवीज कशी करावी, असा प्रश्न त्यांच्या समोर आहे.
लाखोंचे नुकसान
कोरोनामुळे केळ्याचे भाव पडले आहे. वादळाने केळी जमीनदोस्त झाली. लाखो रुपयांचे नुकसान झाले. मका बाजारात विकता आला नाही. केळीचे भाव पडल्याने वाहतुकीचाही खर्च निघत नाही. मजुरीचे दर वाढल्याने लागवडीचा खर्चही निघत नाही. आता शासनानेच मदत करावी, अशी अपेक्षा आहे.’
गजानन मनोहर पोटे,
शेतकरी, वडगाव जंगल ता. यवतमाळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.