esakal | ‘तुम्हीच सांगा काय चूक होती आमची? आईला बघण्याआधीच कायमचे मिटावे लागले डोळे
sakal

बोलून बातमी शोधा

story of 10 child who died in bhandara district hospital fire

जेव्हा ही घटना घडली तेव्हा आम्ही आणि आई गाढ झोपेत होतो. आमच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी हंबरडा फोडला. काहीही कळायच्या आत ही घटना घडल्याने सर्वांना धक्का बसला. आता ‘काय करावे आणि काय नाही’ या विचारात बाबा इकडे तिकडे फिरत होते. आईला सांभाळू की मुलाला पाहायला जाऊ याच विचारात ते धावपळ करीत होते.

‘तुम्हीच सांगा काय चूक होती आमची? आईला बघण्याआधीच कायमचे मिटावे लागले डोळे

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : हॅलो आई... हॅलो बाबा... आजी, आजोबा, काका, काकू मी बाबा झालो. तुमच्या सुनेने सुंदर बाळाला जन्म दिल होऽऽ... अरे पोरा मुलगा झाला की मुलगी... हे तर सांग... काहीही होऽऽ मला काही फरक पडत नाही... मी बाबा झालो याचा आनंद जास्त आहे. तुम्ही रुग्णालयात या मी तुमची वाट बघत आहे... असे माझे बाबा सर्वांना फोन करून सांगत होते. सर्वांसोबत ते आपला आनंद शेअर करीत होते... मात्र, नियतीला हे मान्य नव्हते... म्हणूनच आम्हा नवजात बालकांसोबत असा दुर्दैवी प्रसंग घडला...

आमच्या आईला प्रसूती कळा होऊ लागल्याने भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल नऊ महिने गर्भात सांभाळ केल्यानंतर आमचा जन्म झाला. काहींचा जन्म सामान्य तर काहींना सिझेरीनने झाला. आमच्यापैकी कुणाचा जन्म दोन दिवसांपूर्वी तर काहींचा एक दिवसाअगोदर झाला. त्यामुळे आमच्या जन्माचा आनंद साजरा सुरूच होता. रुग्णालयात आम्हाला बघण्यासाठी नातेवाईक गर्दी करीत होते.

काय सांगता! रुग्णालयाचे फायर ऑडिट झालेच नव्हते, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ चौकशीचे आदेश

आमचा जन्म झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (SNCU) ठेवले होते. आम्हा दहापैकी काहींनी आईला सुद्घा बघितले नाही. आम्ही आईची आणि आई आमची आतुरतेने वाट पाहत होती. आई सतत ‘मला बाळाचा चेहरा दाखवा’ असे वडिलांना म्हणत होती. बाबा थोडा वेळ थांब तुला बाळाला घेता येईल असे सांगत होते. यानंतर आई थोडी शांत झाली.

दुसरीकडे आमच्या घरी आगमनासाठी जय्यत तयारी सुरू होती. आमचे आई-वडील आपापल्या परीने स्वागतासाठी तयार होत होते. मात्र, नियतीला आमच्या आई-वडिलांचे सुख काही पाहवले नाही. शनिवारची पहाट आमच्यासह आई-वडिसांसाठी कर्दनकाळ ठरली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (SNCU) अचानक आग लागली. या भीषण आगीत आम्हा दहा बाळाचा होरपळून मृत्यू झाला.

जेव्हा ही घटना घडली तेव्हा आम्ही आणि आई गाढ झोपेत होतो. आमच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी हंबरडा फोडला. काहीही कळायच्या आत ही घटना घडल्याने सर्वांना धक्का बसला. आता ‘काय करावे आणि काय नाही’ या विचारात बाबा इकडे तिकडे फिरत होते. आईला सांभाळू की मुलाला पाहायला जाऊ याच विचारात ते धावपळ करीत होते. मात्र, त्यांना काहीही करता आले नाही. आमच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ज्यांनी अजून जगही पाहिलं नव्हतं, त्याच दहा बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट नाही

जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झाले नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. या घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. फायर ॲाडिट का करण्यात आले नाही, इलेक्ट्रिकल ऑडिट का झाले नाही आणि त्या वॅार्डात २४ तास परिचारिका होती का, असे एक ना अनेक प्रश्‍न या घटनेने उभे केले आहेत.

वॉर्डात २४ तास परिचारिका होती का?

शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीत तब्बल दहा बाळांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर सात बाळांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र, प्रश्न उपस्थित होतो वॅार्डात २४ तास परिचारिका होती का? बाळांवर लक्ष ठेवण्यासाठी वॉर्डात परिचारिका असणे गरजेचे आहे. मात्र, येथे कोणी उपस्थित नसेल तर हा गंभीर प्रकार आहे. असे असेल तर रुग्णालयावर कडक कारवाई व्हायला हवी.

loading image
go to top