Sunday Motivation : व्वा रे शेतकरी राजा, शेतात घाम गाळून मुलाला केले कृषी उपसंचालक

arvind
arvind

भंडारा : अनंत अमुची ध्येयासक्‍ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला समुद्राच्या घनगंभीर लाटांवर स्वार होत समुद्र उल्लंघून जाणाऱ्या कोलंबसासारखे अनेकजण आपल्या महत्त्वाकांक्षेच्या लाटेवर स्वार होऊन ध्येयाकडे प्रवास करीत असतात. आणि जीवनात उच्च ध्येयाकांक्षा असलेल्या व्यक्‍तीच्या पायाशी यश चालत येते. फक्‍त अपरिमित कष्टांची तयारी हवी. असे कष्ट सहन करून ध्येय गाठणाऱ्या अरविंदची ही कथा.
काळ्या मातीत कष्टाने घाम गाळून मोती पिकविणाऱ्या शेतकरीपुत्राने खऱ्या अर्थाने देदिप्यमान व उत्तुंग असे यशाचे शिखर काबीज केले आहे. लाखनी तालुक्‍यातील नरव्ह या छोट्याशा खेडेगावातील अरविंद सुरेश उपरीकर हा उमदा तरुण वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी नागपूर येथे कृषी उपसंचालकपदी रुजू झाला.
नरव्ह हे साठ-सत्तर कुटुंबाचे नदीकाठावर वसलेले लहानसे गाव. आताही या गावात एस.टी जात नाही.
शेती हा या गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय. अरविंद यांचे वडीलसुद्धा शेतकरी. घरी साडेचार एकर शेती. आई, विवाहित बहीण व मोठा भाऊ, वहिनी असे कुटुंब. वडील व मोठा दादा अहोरात्र कष्ट उपसून शेती करतात. परंतु, त्यातून पुरेसे काही हाती लागत नाही. त्यामुळे अरविंद याने उच्चशिक्षण घेऊन कृषी शास्त्रज्ञ होण्याचे ध्येय बाळगले होते. गावातील तालुका कृषी अधिकारी असणारे किशोर पात्रीकर यांच्यापासून त्याला प्रेरणा मिळाली. अरविंदचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. खराशी येथील रावजी फटे विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेत पालांदूर येथील गोविंद विद्यालयातून तो विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाला. त्यानंतर नागपूर येथून बीएस्सी ऍग्रीकल्चरची पदवी घेतली. पुढच्या शिक्षणाची ओढ असल्याने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. घरची आर्थिक परिस्थिती सामान्य व जेमतेम असतानाही कुटुंबीयांनी सतत पाठबळ व प्रोत्साहन दिले. त्यामुळे पुढची वाटचाल सुकर झाल्याचे अरविंद उपरीकर यांनी सांगितले.
सातबारा पॅटर्नने बदलले आयुष्य
राहुरी येथे कृषिविज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. कृषी शास्त्रज्ञ होण्याच्या दृष्टीनेही संबंधित परीक्षेचा अभ्यास सुरू होता. सोबतच्या सहकाऱ्यांच्या मदतीने सकाळी सात ते दुपारी 12 पर्यंत दररोज या अनुषंगाने पाच तास तयारी सुरू होती. वरिष्ठ सहकारी मार्गदर्शन करायचे. गेस्ट लेक्‍चरसुद्धा व्हायचे. याला कॅम्पसमध्ये सातबारा पॅटर्न म्हणून ओळखतात. याच सातबाराने आपल्या आयुष्याचाही सातबारा बदलल्याचे अरविंद यांनी सकाळशी बोलताना सांगितले.
असा झाला प्रवास..
बीएस्सी ऍग्रीचे शिक्षण घेताना जिल्ह्यातील 15 ते 20 जण सोबत होते. त्यापैकी अनेक जण विविध ठिकाणी नोकरीवर लागले. परंतु, त्यामधून गॅझेटेड ऑफिसर झालेला अरविंद हा एकटा आहे.
एमएस्सीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाबीजमध्ये सहायक क्षेत्रीय अधिकारी म्हणून त्याची निवड झाली. या परीक्षेत तो राज्यातून सहाव्या स्थानी होता. परंतु, एवढ्यावरच समाधान न झाल्याने अरविंदची धडपड सुरूच होती. एप्रिल 2019 मध्ये त्याने या पदाचा राजीनामा दिला. दोन महिने पुन्हा राहुरीत जाऊन परीक्षेची तयारी केली. त्यानंतरच्या काळात तो वडील आणि भावाबरोबर शेतीच्या कामात हातभार लावायचा. चांगल्या नोकरीवर पाणी सोडल्याने कुटुंबीय नाराज होते. परंतु, यश खेचून आणण्याची ताकद आपल्यात आहे, याची खात्री व आत्मविश्वास अरविंदला होता. 2018 मध्ये राज्य लोकसेवा आयोगातर्फे मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व कृषी उपसंचालक पदासाठी परीक्षा घेण्यात आली. पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा व मुलाखत असे अग्निदिव्य पार करून अखेर अरविंदने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर यश प्राप्त केले. 18 फेब्रुवारीला अरविंद नागपूर येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात कृषी सहसंचालक म्हणून रुजू झाला. थेट निवडीअंतर्गत प्राप्त होणारे हे या विभागातील सर्वोच्च पद आहे.
गावात सुरू करणार अभ्यासकेंद्र
शेतकऱ्याच्या मुलाला कष्टाचा व अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, त्यांचा बाऊ करून चालणार नाही. जिद्द व परिश्रमाने त्यावर मात करण्याची तयारी हवी. मग ते क्षेत्र कोणतेही असो. शेतीतही नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास, बदल घडवून आणण्यास सहसा शेतकरी तयार होत नाही. त्यात परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी नव्या पिढीने घ्यायला हवी. गावातील तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहात आणण्यासाठी वाचनालय व अभ्यासकेंद्र सुरू करण्याचा आपला संकल्प आहे.
अरविंद उपरीकर
कृषी उपसंचालक, नागपूर  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com