महाबळेश्‍वरनंतर विदर्भातील या ठिकाणी घेतले जाते स्ट्रॉबेरीचे पीक

Strawberry
Strawberry

अमरावती : लागवड खर्चाच्या दुप्पट उत्पन्न मिळवून देणाऱ्या स्ट्रॉबेरीला महाराष्ट्रात महाबळेश्‍वरनंतर विदर्भाच्या नंदनवनातील चिखलदऱ्याचे वातावरण पोषक ठरले. सलग पाच वर्षांच्या प्रयोगातून ही बाब सिद्ध झाली. मात्र, चिखलदऱ्यातील स्ट्रॉबेरी शेतीला राजाश्रय मिळाला नाही तर या फळपिकाची स्थिती कॉफीमळ्यासारखीच होण्याची शक्‍यता आहे.

कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि श्रीशिवाजी उद्यानविद्या विभागाच्या सहकार्याने विदर्भातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदरा तालुक्‍यात 2015 मध्ये स्ट्रॉबेरी लागवडीचा पहिला प्रयोग केला. स्ट्रॉबेरीच्या "विंटरडॉन' या वानाला चिखलदऱ्याचे थंड वातावरण व माती पोषक ठरली. प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर 50 शेतकऱ्यांनी प्रत्येकी दहा गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड केली.

स्ट्रॉबेरीला हवाय राजाश्रय
आंबुस-गोड चवीची ही रसाळ स्ट्रॉबेरी पर्यटकांच्या पसंतीला उतरली. प्रतिकिलो 200 ते 250 रुपये दर मिळू लागल्याने सरकारला अपेक्षित शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने भर पडली. चिखलदऱ्यातील पर्यटकांसोबत ती विदर्भात जेमतेम पोहचू लागली. मात्र यावर्षी केवळ तीन-चार शेतकऱ्यांनीच अवघ्या साडेतीन एकरात स्ट्राबेरीची लागवड केली. चिखलदरा परिसरात यापूर्वी शेतकऱ्यांच्या श्रमाने बहरलेल्या कॉफीमळ्यांवर राजाश्रयाअभावी अवकळा आली. तीच अवस्था स्ट्रॉबेरीची होते की काय, अशी शंका आहे.

जाणून घ्या - आदित्य ठाकरे विचारणार पतंप्रधान नरेंद्र मोदींना हा प्रश्‍न...

स्ट्रॉबेरी शेतीचे अर्थकारण
स्ट्रॉबेरीचा लागवड कालावधी सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर आहे. लागवडीपासून 40 ते 50 दिवसानंतर त्याला फूल व पाठोपाठ फळ येण्यास सुरुवात होते. हा हंगाम मार्चपर्यंत चालतो. एका झाडाला सर्वसाधारणपणे 500 ते 750 ग्रॅम फळे लागतात. सात ते दहा रुपये प्रति रोपांची किंमत असते. एक एकरातील रोपांची संख्या सुमारे 20 हजारांच्या घरात असते. वाहतूक आणि मशागत, लागवड असा प्रतिएकरी एकूण दोन-सव्वादोन लाखांचा खर्च येतो. या उलट एकरी किमान साडेचार लाख रुपये उत्पन्न हमखास मिळत आहे.

स्ट्रॉबेरी पिकातून पाच वर्षांत आतापर्यंत हमखास उत्पन्न मिळाले. जास्त उत्पादन झाल्यास साठवणुकीची सोय नाही. रोप खरेदीवर एकावेळी मोठा खर्च होत असल्याने व शासनाकडून आर्थिक स्वरूपात मदत नसल्याने शेतकरी स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी धजावत नाही.
- गजानन शनवारे, स्ट्रॉबेरी उत्पादक, रा. मोथा.


स्ट्रॉबेरी लागवडीसाठी सर्वच तांत्रिक साहाय्य केले जाते. पर्यटकांच्या संख्येमुळे तूर्त मार्केटिंगची समस्या नाही. यावर्षीपासून 40 टक्के अनुदान दिले जाते. या अनुदानामुळे स्ट्रॉबेरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल, अशी अपेक्षा आहे.
-प्रा. शशांक देशमुख
श्रीशिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com