यवतमाळ जिल्ह्यात धुवाधार पाऊस, वीज पडून शेतकरी ठार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

तालुक्‍यातील साखरा येथील शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला, तर दिग्रस तालुक्‍यातील फेट्री येथे वीजतारा तुटून अंगावर पडल्याने पाच गायी व एक बैल दगावला. इतर तालुक्‍यांतही जोरदार पाऊस झाला, काही ठिकाणी रस्त्यावर मोठाले वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक बंद झाली होती.

यवतमाळ : अजून मान्सून विदर्भात यायचाच आहे. मृगाच्या पावसाचे तांडव मात्र जिल्ह्यात सुरू झाले आहे. बुधवारी (ता.दहा) मृगाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मारेगाव, दिग्रस व आर्णी तालुक्‍यांत वादळवाऱ्यासह पाऊस झाला. मारेगाव तालुक्‍यातील साखरा येथील शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला, तर दिग्रस तालुक्‍यातील फेट्री येथे वीजतारा तुटून अंगावर पडल्याने पाच गायी व एक बैल दगावला. इतर तालुक्‍यांतही जोरदार पाऊस झाला, काही ठिकाणी रस्त्यावर मोठाले वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक बंद झाली होती.
विनोद केशव किनाके (वय 35, रा. साखरा) असे वीज पडून मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. विनोद शेतात काम करीत असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी (ता.10) सायंकाळी साडेचार वाजतादरम्यान घडली. विनोद किनाके आपल्या शेतात वखरणी करीत होते. अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यामागे आईवडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. घरातला एकमेव कर्ता गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बैल ठार, तर महिला जखमी
दिग्रस तालुक्‍यातील राहटी येथे वीज पडून एक बैल ठार, तर महिला जखमी झाल्याची घटना दुपारी एकच्या सुमास घडली. फेट्री येथे वादळामुळे वीजतारा तुटून अंगावर पडल्याने पाच गायी जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. विश्वनाथ भवाळ, राजू धनगर, अनंता भालेराव, उमेश गायकवाड, शीला कांबळे यांच्या मालकीच्या या गायी होत्या. तलाठी सुमेध खंडारे यांनी फेट्री येथे जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला, तर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी सुनील वाठोरे यांनी गायींचे शवविच्छेदन केले.

सविस्तर वाचा - कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर अमरावतीत

राहटी येथील बळीराम धनसिंग राठोड यांच्या शेतात वखरणी करीत असताना दुपारी एकच्या सुमारास वीज पडून एक बैल जागीच ठार झाला, तर वखरणी करणारी महिला जनुबाई राजू राठोड (वय 30) हिच्या हाताला विजेचा धक्का लागल्याने ती किरकोळ जखमी झाली. तलाठी रवी कवटकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दिग्रस तालुक्‍यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक झाडांच्या फांद्या तारांवर पडल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. दिग्रस तालुक्‍यातील काटी ते राहटी रस्त्यावर झाडं उन्मळून पडल्याने रस्ता बंद झाला होता. यवतमाळ शहरासह तालुक्‍यातही पावसाच्या धारा कोसळल्या. तर, काही भागांत पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले. मृग नक्षत्राला गेल्या रविवारपासून (ता.सात) सुरुवात झाली. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stromy rain in Yawatmal district, one farmer died