
पावसाळ्यात होणाऱ्या चिखलामुळे त्यांना झोपडीत राहणेही अवघड होऊन जाते. ‘जिना यहां मरणा यहां, इसके सिवा जाना कहां’ या गीताला आठवत आपल्याच श्रीमंतीत ते जगतात.
आर्णी (जि. यवतमाळ) : पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्याकडील मजूर दुसऱ्या राज्यात जातात. तर परराज्यातील व्यावसायिक, मजूर आपल्या राज्यात येतात. अशाच व्यावसायिकांसह भिक्षेकऱ्यांचा जत्था आर्णीत दाखल झाला आहे. अंग झाकण्यासाठी वापरणाऱ्या साड्यांच्या त्यांनी झोपड्या तयार केल्या आहेत. ‘ना घर, ना दार’ उघड्यावरील त्यांचा संसार बघून कुणालाही संघर्षाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
आर्णी शहरातील अरुणावती नदीपात्राजवळील मोकळ्या भूखंडावर परप्रांतीय व्यावसायिक, मजूर, भिक्षेकऱ्यांनी झोपड्या थाटल्या आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणताही ऋतू असो, परप्रांतीय आपल्याच झोपडीत वास्तव्यास राहतात. पावसापासून बचाव करण्यासाठी आतमधून प्लॅस्टिक लावले जाते. तीन दगडांच्या चुलीवर अन्न शिजवून पोटाची खळगी भरतात.
पावसाळ्यात होणाऱ्या चिखलामुळे त्यांना झोपडीत राहणेही अवघड होऊन जाते. ‘जिना यहां मरणा यहां, इसके सिवा जाना कहां’ या गीताला आठवत आपल्याच श्रीमंतीत ते जगतात. सर्व सुविधा असूनही त्यामागे धावणारा मध्यमवर्गीय, प्रतिष्ठित नागरिक तर कफल्लक असूनही कुरबूर न करता जगणारा झोपडीतील माणूस यांच्यात श्रीमंत कोण, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
पंखा, कुलर, वीज, फ्रिज कशाला म्हणतात? त्याचा वापर कसा करायचा, हे त्यांना माहिती नाही. कुणी मजुरी करतात तर कुणी लहान-सहान वस्तू विकून कुटुंबाला जगवतात. विवाह सोहळाही याच झोपडीत होतो. सर्व वातावरणात ‘श्रीमंती’ असते. महिलांची प्रसूती दवाखान्यापासून दूर झोपडीतच होते.
संपादन - नीलेश डाखोरे