esakal | सामान्य शेतकऱ्याची बायको ते महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्ष, वाचा कोण आहेत संध्या सव्वालाखे
sakal

बोलून बातमी शोधा

Who is Sandhya Savvalakhe President of Maharashtra Woman Congress

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौ. संध्या दिलीपराव सव्वालाखे यांची वर्णी लागली अन् संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा त्यांच्या राजकीय आलेखाकडे रोखल्या गेल्या. एक सामान्य गृहिणी ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा जीवनपट आहे.

सामान्य शेतकऱ्याची बायको ते महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्ष, वाचा कोण आहेत संध्या सव्वालाखे

sakal_logo
By
राजकुमार भीतकर

यवतमाळ : बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण होणार? अशी चर्चा रंगली आहे. त्यासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. विदर्भाला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद मिळेल, अशाही चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता दिल्ली हायकमांडने महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती केली आहे. 

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौ. संध्या दिलीपराव सव्वालाखे यांची वर्णी लागली अन् संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा त्यांच्या राजकीय आलेखाकडे रोखल्या गेल्या. एक सामान्य गृहिणी ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा जीवनपट आहे. गेल्या पाच दशकांत त्यांनी विविध पदे भूषविली आहेत. विविध पदांना न्याय दिला असून खंबीर नेतृत्व म्हणूनच पक्षात त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी बहुजन समाजातील महिलेला संधी मिळाल्यामुळे आता  महिलांसाठी सहज राजकारणाची दारे उघडली जातील, असा आशावादही व्यक्त केला जात आहे.

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

काँग्रेस पक्ष बदलत्या महाराष्ट्राला सक्षम नेतृत्व देत असल्याचे काही घटनांवरून दिसते. संध्या सव्वालाखेना दिलेली जबाबदारी हेच सूचित करते. अलीकडे काँग्रेस पक्षांत इतर ’विंग’ला फार गांभीर्याने घेतले जात नव्हते. कदाचित, ’स्वनिर्णय क्षमता’ असलेल्या नेतृत्वाचा अभाव यामागील कारण असू शकते. परंतु, सव्वालाखे या स्वनिर्णय क्षमता असलेल्या नेत्या आहेत. त्यामुळे यापुढे प्रदेश काँग्रेसमध्ये महिला काँग्रेसचा दबदबा वाढणार एवढे मात्र निश्‍चित आहे. 

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी एका कर्तबगार व सक्षम नेतृत्वाची निवड केली, अशी प्रतिक्रिया जनमानसात आहे. संध्या सव्वालाखे यांचा जीवनपट बघितला तर त्या गेल्या पाच दशकांपासून राजकारण, समाजकारण व शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत. दरम्यान, त्यांनी विविध जबाबदार पदांवर कार्य केले आहे. त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविला आहे.
 
कोण आहेत संध्या सव्वालाखे 

संध्या सव्वालाखे यांचे माहेर अमरावती जिल्ह्यातील चांदूर (रेल्वे) हे आहे. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1969 मध्ये झाला. त्यांचे माहेरचे आडनाव शिरभाते आहे. बाभूळगाव तालुक्यातील पहूर येथील शेतकरी दिलीप सव्वालाखे यांचेशी त्यांचे लग्न झाले. त्यांनी सुरुवातीला काही वर्षे शेती केली. पतीच्या व्यवसायालादेखील हातभार लावला. त्यांनी पहिली निवडणूक व्ही. पी. सिंग देशाचे प्रधानमंत्री असताना जनता दलाकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. पहूर-सावर या जिल्हा परिषद सर्कलमधून त्या 1997 मध्ये निवडून आल्या. 1997 ते 2000पर्यंत त्या सदस्य होत्या. येथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर 2000मध्ये त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. 

2002-2007 व 2007 ते 2012 सलग दहा वर्षे त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मतदारसंघाचे नेतृत्व केले. हा त्यांच्या राजकीय उत्कर्षाचा काळ आहे. दरम्यान, त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. तसेच यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. येथून त्यांचा पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सहभाग वाढला. देश व राज्यपातळीवरील नेत्यांशी त्यांचा संपर्क आला. त्या प्रत्यक्ष पक्षप्रमुख सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या संपर्कात आल्या. त्यांच्यातील उदयोन्मुख नेतृत्व बघून त्यांना विविध राज्यांमध्ये निवडणुकीच्या काळात निरीक्षक म्हणून नेमण्यात आले. 

नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

त्या देशाच्या विविध राज्यात काँग्रेसच्या प्रचारासाठी गेल्या. तेथील संघटनात्मक बांधणीत लक्ष घातले. ऑल इंडिया महिला काँग्रेस कमिटीच्या त्या जनरल सेक्रेटरी आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या सिनेट सदस्य आहेत. एम.सी.ई.आर बोर्ड पुणेच्या संचालक आहेत. जिल्हा नियोजन समिती, जिल्हा शिक्षण समितीच्या सदस्य आहेत. त्या सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून अखिल भारतीय तेली समाज संघाच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या नियुक्तीचा फायदा काँग्रेस पक्षाला होईल, अशा प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांकडूनही ऐकायला मिळत आहेत.


संपादन - अथर्व महांकाळ