एसटीच्या मोफत पासचा असाही साईडइफेक्ट; ग्रामीण शाळांतील विद्यार्थीसंख्या लागली घटू...

साईनाथ सोनटक्के 
Monday, 13 July 2020

शिक्षणाची सुविधा नसलेल्या गावांतील मुलींना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे म्हणून मानव विकास मिशन तथा अहल्यादेवी होळकर मोफत पास योजना राबविली जाते. इयत्ता 5 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जातो.

चंद्रपूर : गावखेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे म्हणून मानव विकास मिशन तथा अहल्यादेवी होळकर मोफत पास सुविधा आहे. मात्र, ही सुविधा गावखेड्यातील शाळांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जाण्या-येण्याची मोफत पास असल्याने अनेक विद्यार्थी जवळच्या शाळा ओलांडून शहरांतील शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यामुळे गावांतील शाळांची पटसंख्या घटू लागली आहे. त्यामुळे शाळा ओलांडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पासचा लाभ देऊ नये, अशी मागणी खुद्द मुख्याध्यापकांनीच केली आहे. 

शिक्षणाची सुविधा नसलेल्या गावांतील मुलींना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे म्हणून मानव विकास मिशन तथा अहल्यादेवी होळकर मोफत पास योजना राबविली जाते. इयत्ता 5 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जातो. जवळच्या शाळेत प्रवेश घेत शाळेत नियमित जाण्यासाठी मोफत पास व बसची सुविधा दिली जाते. मात्र, या सुविधेमुळे अनेक विद्यार्थी जवळच्या शाळेत प्रवेश न घेता थेट शहरी भागातील शाळांमध्ये प्रवेश घेऊ लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यालये, महाविद्यालयांतील पटसंख्या रोडावू लागली आहे. 

राज्य परिवहन महामंडळाकडून योग्य चौकशी करून जवळच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पासची सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून अनेक विद्यार्थी जवळच्या शाळेत प्रवेश घेतील आणि शाळांतील पटसंख्या टिकून राहण्यास मदत होणार आहे. राजुरा तालुक्‍यातील कढोली, वरूर रोड, विरूर स्टे., लक्कडकोट, देवाडा, चिंचोली, अहेरी, पांढरपौनी, साखरी येथे शाळा, महाविद्यालये आहेत. परिसरातील सोंडो, सोनुर्ली, सिद्धेश्‍वर, टेंभुरवाही, वरूर, देवाडा, भेदोडा, साखरवाही, रानवेली, भुरकुंडा, मुखडपल्ली, चिंगबोडी येथील विद्यार्थ्यांना जवळ शिक्षणाची सुविधा आहे. मात्र, येथील अनेक विद्यार्थी केवळ मोफत पास मिळत असल्याने राजुरा येथे जाणे पसंद करीत आहेत. त्यामुळे परिसरातील शाळा, महाविद्यालये ओस पडू लागली आहेत. 

अवश्य वाचा- `माझ्याशी लग्न कर अन् बायकोला हाकलून दे` प्रेयसीने तगादा लावल्याने प्रियकराने दिले विहिरीत ढकलून.... 

त्यामुळे राजुरा तालुक्‍यातील अनेक शाळा, महाविद्यालयांतील मुख्याध्यापकांनी राज्य परिवहन महामंडळाचे आगारप्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. जवळच्या शाळांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मोफत पास देण्यात यावा. शाळा ओलांडून शहरी भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पासची सुविधा देण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनातून केली आहे. हा प्रकार मागील वर्षांपासून सुरू आहे. 2018 मध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बैठकीत आगारप्रमुखांना शाळा ओलांडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पास देऊ नये, असे ठरविण्यात आले होते. परंतु, राज्य परिवहन महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुख्याध्यापकांकडून करण्यात आला आहे. 

अवश्य वाचा- घरातच उघडला होता त्याने बनावट विदेशी दारूचा कारखाना, अन् एक दिवस... 

...तर शिक्षक ठरणार अतिरिक्त! 

ग्रामीण भागातील शाळांना पटसंख्या कायम ठेवताना मोठी कसरत करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक शिक्षकांना विद्यार्थी शोधमोहिमेवर जावे लागते. पालकांना अनेक आमिषे देतात. केवळ नोकरी टिकविण्यासाठी शिक्षक हा सर्व प्रकार करीत असतात. मात्र, आता मोफत पासची सुविधा शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. पटसंख्या नसल्यास अनेक शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST's free student pass is a headache for rural schools.