esakal | पोलिस अभ्यासिका बनली तरुणाईसाठी वरदान; सुरक्षित वातावरणात स्पर्धा परीक्षेची तयारी

बोलून बातमी शोधा

student Preparing for competitive exams in a safe environment Amravati education news

अल्पावधीत १४० विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेसाठी नोंदणी केली असून वेळापत्रकानुसार ते येथे अभ्यासाला येतात. पोलिस स्टेशन परिसरात असल्याने मुलींना अभ्यास करतांना सुरक्षिततेची भावना येत असल्याचे मनीषा पवार, साक्षी शेरजे, ऋतुजा धामंदे या विद्यार्थिनीने सांगितले.

पोलिस अभ्यासिका बनली तरुणाईसाठी वरदान; सुरक्षित वातावरणात स्पर्धा परीक्षेची तयारी

sakal_logo
By
विवेक राऊत

चांदुर रेल्वे (जि. अमरावती) : पोलिस स्टेशन म्हटलं तर सर्वांना थोडी भीतीच वाटते. कोणीही सहज पोलिस स्टेशनला जात नाही. पण, दोन महिन्यांपासून अनेक विद्यार्थ्यांची वर्दळ पोलिस स्टेशन परिसरात पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांसाठी येथे डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. अवघ्या दोन महिन्यांत तालुक्‍यातील शेकडो विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.

पोलिसांची जनमानसात प्रतिमा पहिली तर कायदा शिकविणारे, दंडे मारणारे असे काहीसे चित्र समाजात आहे. परंतु, त्या समोर जाऊन एक सुरक्षित व सुशिक्षित समाजाची निर्मिती व्हावी हेही कर्तव्य पोलिसांचे आहे. त्याच विचाराने पोलिस स्टेशन तिथे अभ्यासिका हा उपक्रम पोलिस अधीक्षक हरी बालाजी यांनी जिल्ह्यात राबविला.

जाणून घ्या - प्रेमात आंधळ्या वनाधिकाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांनीच केली तक्रार

त्याचाच भाग म्हणून स्थानिक पोलिस स्टेशनचे ठाणेदार मगन मेहते यांनी अप्पर पोलिस अधीक्षक शाम घुगे व तालुक्‍याचे उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला व्यक्तिशः घेत परिसरातच एका इमारतीचे सुसज्ज अशा अभ्यासिकेत रूपांतर केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हवी ती सुविधा त्यांनी या अभ्यासिकेत उपलब्ध करून दिली आहे.

या शिवाय स्वतः स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन ठाणेदार मेहते विद्यार्थ्यांना करतात. त्यामुळे अल्पावधीत १४० विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेसाठी नोंदणी केली असून वेळापत्रकानुसार ते येथे अभ्यासाला येतात. पोलिस स्टेशन परिसरात असल्याने मुलींना अभ्यास करतांना सुरक्षिततेची भावना येत असल्याचे मनीषा पवार, साक्षी शेरजे, ऋतुजा धामंदे या विद्यार्थिनीने सांगितले.

हेही वाचा - शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; शाळा बंद आढळल्यास होणार कारवाई

विद्यार्थ्यांना ठाणेदारांकडून धडे

गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ठाणेदार मगन मेहते यांच्याकडून धडाक्‍यात कारवाया सुरू आहेत. कडक शिस्तीशिवाय स्पर्धा परीक्षेचे उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. रोज त्यांची एक भेट या अभ्यासिकेला असून विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सोबतच युवकांसाठी सुसज्ज जिम पोलिस स्टेशन मार्फत सुरू करीत असल्याचे त्यांनी सांगितले.