जिल्हा परिषदचे विद्यार्थी करणार विमानाने प्रवास; सावरगाव शाळेची मुले निघाली संसद बघायला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

विद्यार्थी भारतीय संसद, दिल्ली सरकारच्या शाळा, राष्ट्रपती भवनाला भेटी देणार असून, विविध माहिती जाणून घेणार आहेत. बुधवार 27 ते शुक्रवार 29 नोव्हेंबर या कालावधीत ते दिल्लीत असतील. 

सावरगाव, (जि. नागपूर) : समग्र शिक्षाअंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान 2019-20 या उपक्रमाअंतर्गत राज्याबाहेरच्या महत्त्वाच्या स्थळांना भेटी (एक्‍पोझर व्हिजिट आउटसाइड स्टेट) या कार्यक्रमाअंतर्गत सावरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक दोनच्या विद्यार्थ्यांना संसद भवनाची सैर करता येणार आहे. 

सावरगावच्या जिल्हा परिषद शाळेतील यश संदीप येलेकर, आदेश सुरेंद्र ठोंबरे, राहुल विष्णुपंत वसुले, रेहान इस्राइल शेख, राहुल चंद्रशेखर घोडे व मुख्याध्यापक वीरेंद्र वाघमारे हे सर्व दिल्लीकडे रवाना झाला आहे. दिल्ली मध्ये हे विद्यार्थी भारतीय संसद, दिल्ली सरकारच्या शाळा, राष्ट्रपती भवनाला भेटी देणार असून, विविध माहिती जाणून घेणार आहेत. बुधवार 27 ते शुक्रवार 29 नोव्हेंबर या कालावधीत ते दिल्लीत असतील. 

राजधानीला भेट देण्याची संधी 

यातील आकर्षक बाब अशी की, ही ग्रामीण भागातील मुले विमानाने दिल्लीला रवाना झाली आहेत. 
ग्रामीण भागातील मुलांना विमान प्रवासाची व देशाच्या राजधानीला भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश गिरडकर, उपाध्यक्ष शाहिन बनाफर, समितीचे सदस्य राजेंद्र रेवतकर, सुनील रेवतकर, देवेंद्र रेवतकर, पूनम पोटे, सुशीला रेवतकर तसेच सर्व सावरगाववासींनी आनंद व्यक्त करून गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांचे आभार मानले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students of Savargaon ZP School in Delhi