वर्गात हजेरी नसेल तर परीक्षेलाही बसणार दांडी

प्रवीण खेते
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या मार्गदर्शनात पथकाने शहरातील कला, वाणिज्य, विज्ञान सुधाकरराव नाईक महाविद्यालय, जागृती उच्च माध्यमिक विद्यालय आणि आर. डी. जी. महिला महाविद्यालयांची आकस्मिक तपासणी केली.

अकाेला - खासगी काेचिंग क्लासेसमध्ये तासनतास बसणाऱ्या अकरावी, बारावीचे विद्यार्थी वर्ग तासिकांना मात्र दांडी मारत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परंतु, यापुढे वर्गात गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही, असे आदेश माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिले. 

माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या मार्गदर्शनात पथकाने शहरातील कला, वाणिज्य, विज्ञान सुधाकरराव नाईक महाविद्यालय, जागृती उच्च माध्यमिक विद्यालय आणि आर. डी. जी. महिला महाविद्यालयांची आकस्मिक तपासणी केली. दरम्यान बहुतांश उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची लक्षणीय अनुपस्थिती निदर्शनास आली. नियमानुसार, उच्च माध्यमिक विद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखेच्या इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार वर्गात उपस्थिती लावणे आवश्यक आहे. परंतु, तसे हाेत नसल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले. नियमानुसार, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची वेळापत्रकानुसार वर्गात उपस्थिती आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी वर्गात उपस्थिती दर्शविली नाही, त्यांना परीक्षाच देता येणार नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

विविध संघटनांचे निवेदन -
जिल्ह्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांच्या उपस्थितीसंदर्भात जिल्ह्यातील काही संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या संघटनांचेही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर विशेष लक्ष आहे. 

वेळापत्रकासह शिक्षकांची यादी सादर करण्याचे आदेश -
उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नियुक्त केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांची यादी तसेच नियमित वेळापत्र कार्यालयामध्ये सादर करण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात आले हाेते. परंतु, बहुतांश शिक्षकांनी यादी आणि वेळापत्रक सादर केले नाही. 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या संचालकांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व शाखांची नियमित पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे. विद्यार्थी गैरहजर आढळल्यास त्याला परीक्षेत बसता येणार नाही. या बाबत पालकांनी जागृत राहावे. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Web Title: Students who are absent from the class can not be accommodated in the examination