अबब! हे तर गजब झालंय...शाळेत गेले नाही विद्यार्थी, तरी वसूल होतेय शुल्क

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्यात आले नाही. पण, त्यापूर्वीच अनेक खासगी शाळांनी पालकांचे खिसे खाली करणे सुरू केले आहे. विद्यार्थी शाळेत ज्या कालावधीत शिकलेच नाहीत, त्या कालावधीतील शुल्कही पालकांकडून घेतले जात आहे. आधी मागील शुल्क भरा मग पुढचा विचार करू, अशी तंबीही पालकांना दिली जात आहे.

गडचिरोली : यंदा कोरोना या महामारीचे संकट आल्याने मार्च महिन्यात होळीनंतरच विद्यार्थ्यांची शाळा बंद झाली होती. त्यामुळे शाळा नाही, तर शुल्क नाही, हे साधे गणित असताना अनेक खासगी शाळा पालकांकडून मागील शैक्षणिक सत्रातील शुल्क वसूल केले जात आहे. मागचे पैसे न दिल्यास विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार नाही किंवा त्यांना पुस्तके मिळणार नाही, असे धमकीवजा इशारेही दिले जात असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

त्यामुळे शिक्षण विभागाने या गैरप्रकारांकडे लक्ष देऊन, अशा खासगी शाळांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यात शिक्षण देणाऱ्या अनेक खासगी शाळा, कॉन्व्हेंट आहेत. यात शुल्क वार्षिक देण्याची किंवा दर तीन महिन्यांनी म्हणजे त्रैमासिक देण्याची सोय असते. मागील सत्रात मार्च, एप्रिल, मे असे शेवटचे तीन महिने शाळा बंदच होत्या. त्यामुळे शाळा संचालकांना अतिरिक्त खर्च आला नाही. शिवाय विद्यार्थी शाळेतच न गेल्याने त्यांना काहीच शिकवण्यात आले नाही.

संबंधित बातमी : शाळा भरली, पण मास्तरांची... व्यवस्थापन संभ्रमात

आता नवे सत्र सुरू झाले असून अद्यापही विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्यात आले नाही. पण, त्यापूर्वीच अनेक खासगी शाळांनी पालकांचे खिसे खाली करणे सुरू केले आहे. विद्यार्थी शाळेत ज्या कालावधीत शिकलेच नाहीत, त्या कालावधीतील शुल्कही घेतले जात आहे. आधी मागील शुल्क भरा मग पुढचा विचार करू, अशी तंबीही पालकांना दिली जात आहे. त्यामुळे अनेक पालकांनी असंतोष व्यक्त केला आहे. या समस्येकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन हा गैरकारभार त्वरित थांबवावा, अशी मागणी होत आहे.

फक्त घेण्याचेच काम करा

अनेक खासगी शाळांचे संचालक फक्त पैसे घेण्याचेच काम करीत आहेत. म्हणजे कोरोनाच्या सावटात विद्यार्थी शाळेत गेले नसतानाही पालकांकडून पैसे वसूल करण्यात येत आहेत. पण, त्याच कोरोनाचे कारण सांगून तोटा दाखवत शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार न देणे किंवा मोठ्या प्रमाणात पगार कपात करणे सुरू आहे. म्हणजे पालक व शिक्षक, कर्मचाऱ्यांवर अन्याय करून संचालक स्वत:चे उखळ पांढरे करून घेताना दिसून येत आहेत.

गडचिरोलीत अनेक पिढ्यांपासून सुरू आहे पेरणीआधी बिजा पंडूमची परंपरा

उपशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधा

असे प्रकार कुठल्या शाळेत होत असतील, तर या गंभीर प्रकाराची चौकशी मी स्वत: करीन. कोणत्याही पालकाची शाळेसंदर्भात काही तक्रार असल्यास त्यांनी उपशिक्षणाधिकारी उचे यांच्याशी संपर्क साधावा. पालकांना त्रास व विद्यार्थ्यांचे नुकसान कोणत्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही.
आर. पी. निकम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), गडचिरोली

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students will not be admitted to the next class if they do not pay