शाब्बास रे पठ्ठे !सामान्य कुटुंबातील अजरोद्दीनची यशाला गवसणी

ajroddin
ajroddin

यवतमाळ : एकदा ध्येय ठरविले की कितीही संकटे आली तरी जिद्द कायम ठेवत ध्येयाकडे वाटचाल केली तर यश मिळतेच. हे एका सामान्य कुटुंबातील मुलाने दाखवून दिले. 'पदवी अभ्यासक्रमाला असताना युपीएससी परीक्षा देऊन आएएस अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले होते. त्यासाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. यशाचा पाठलाग करताना अडचणी आल्यात. त्यावर मात करीत पुढे गेलो निराश कधीही झालो नाही. युपीएसीत मिळालेले यश कठोर परिश्रमाचे फळ आहे. ध्येय ठरवा, मेहनत घ्या, यश तुमचेच आहे', असे मत युपीएससी परीक्षेत देशातून ३१५ वा रॅंक मिळविलेल्या अजरोद्दीन जहिरुद्दीन काजी या विद्यार्थ्याने व्यक्त केले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.चार) जाहीर झाला. त्यात यवतमाळ येथील रचना कॉलनीतील अजरोद्दीन काजी या सामान्य कुटुंबातील मुलाने यशाला गवसणी घातली. बुधवारी (ता.पाच) अजरोद्दीनने दैनिक "सकाळ'शी संवाद साधला.

आपल्या आयुष्यात संघर्ष आला. मुलांना त्याचे चटके बसू नये, म्हणून वडिलांनी सुरुवातीच्या काळात ऑटो चालवून कुटुंबाचा गाडा ओढला. आईचीही त्यांना मोलाची साथ मिळाली. २००६ मध्ये बारावीत जिल्ह्यात टॉपर आलेल्या अजरोद्दीनने २००९ मध्ये आबासाहेब पारवेकर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी मिळविली.

२०१० मध्ये युपीएससीच्या अभ्यासासाठी दिल्ली गाठली. मात्र, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपण आधी कुटुंबाला आर्थिक हातभार लावला पाहिजे, या विचाराने यवतमाळचा परतीचा प्रवास केला. २०१२ मध्ये बॅंकेची पीओ परीक्षा उत्तीर्ण केली. २०१४ ते २०१८ या कालावधीत यवतमाळ येथेच कॉर्पोरेशन बॅंकेत शाखा प्रबंधक म्हणून कर्तव्य बजावले. विशेष म्हणजे या शाखेची सुरुवात अजरोद्दीनपासूनच झाली.

मात्र, आयएएस होण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नसल्याने थेट नोकरीचा राजीनामा देत मार्च २०१८ मध्ये दिल्ली गाठून युपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. २०१९ मध्ये दिलेल्या परीक्षेत ३१५ वी रॅंक मिळाली. मुलाखतीसाठी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, एसडीओ अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार नीलेश झाल्टे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे अजरोद्दीनने सांगितले.

कुटुंबात डॉक्‍टर, इंजिनिअर, वकील अन्‌ आयएएस
आर्थिक परिस्थितीशी दोन हात करीत जहिरुद्दीन काजी यांनी मुलांना शिक्षणाचा कानमंत्र दिला. परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे कळलेल्या मुलांनीही मागे वळून बघितले नाही. कुटुंबात मोठा असलेल्या अजरोद्दीनने युपीएसीत यशाला गवसणी घातली. दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ जुबेर काजी केमिकल इंजिनिअर, तृतीय उमेर काजी एमबीबीएस डॉक्‍टर तर, सर्वांत लहान साकीब काजीने एलएलबीची पदवी मिळविली असून, वकिली व्यवसाय करतो.

आत्मविश्‍वास, एकाग्रता बाळगावी
आपले शिक्षण मराठी, उर्दू माध्यमातून झाले. इंग्रजी भाषा येत नाही, अशा प्रकारचा न्यूनगंड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळतो. सर्वांत आधी नकारात्मक विचार दूर केला पाहिजे. जिल्ह्यातील तिघांनी युपीएससीत यश मिळविले. तिघांचीही कौटुंबिक परिस्थिती सामान्य आहे. तिघेही ग्रामीण भागातूनच येतो. आम्हाला यश मिळविता आले तर, तुम्हालाही मिळविता येईल. फक्त आत्मविश्‍वास, एकाग्रता बाळगावी. ध्येय गाठेपर्यंत स्वस्थ बसू नये, तुम्हाला यशापासून कुणीही रोखू शकणार नाही.
अजरोद्दीन काजी

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com