प्रेरणादायी... पानटपरी चालवून सांभाळतेय कुटुंब 

सुषमा सावरकर
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नावाजलेल्या क्षेत्रात नावलौकिक मिळविणाऱ्या महिलांबाबत आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र, छोटे छोटे व्यवसाय ज्यावर पुरुषांची मक्‍तेदारी होते, ते स्वीकारून कुटुंबाला आधार देणाऱ्या महिला दुर्मीळच. ललिता मुकेश भारती या अशाच महिलांपैकी एक.

नागपूर  : आज असे कोणतेच क्षेत्र नाही, जिथे महिलांनी स्वत:ला सिद्ध केले नाही. सैन्यदलापासून टॅक्‍सी, बस चालविण्यापर्यंत महिलांनी भरारी घेतली आहे. परंतु, आजही असे बरेच व्यवसाय आहेत, जिथे पुरुषांची मक्‍तेदारी समजली जाते. पानटपरीचा व्यवसायही त्यापैकी एक. परंतु, ललिता मुकेश भारती (वय 35) यांनी पतीच्या अकाली निधनानंतर हाच व्यवसाय समर्थपणे सांभाळून कुटुंबाला आधार दिला. 

नावाजलेल्या क्षेत्रात नावलौकिक मिळविणाऱ्या महिलांबाबत आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र, छोटे छोटे व्यवसाय ज्यावर पुरुषांची मक्‍तेदारी होते, ते स्वीकारून कुटुंबाला आधार देणाऱ्या महिला दुर्मीळच. ललिता मुकेश भारती या अशाच महिलांपैकी एक. बीएपर्यंत शिकलेल्या ललिता वर्धमाननगर परिसरात राहतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. 2008 मध्ये ललिता यांचा विवाह पानठेला चालक मुकेश यांच्याशी झाला. घरी सासू-सासरे, दोघं नवरा-बायको आणि तीन मुलं. सारेकाही सुरळीत असताना आठ महिन्यांपूर्वी मुकेश यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. कुटुंबासाठी त्यांनी मार्बल कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र, मुलगा गेल्याने सुनेला बाहेर नोकरी करावी लागत असल्याची बाब सासऱ्यांना पटत नव्हती. त्यामुळे घरच्याविरोधात न जाता ललिता यांनी महिनाभरात नोकरी सोडली. कालांतराने सासऱ्यांचा मृत्यू झाला. मुलांचे पालनपोषण, शिक्षण आदीचा प्रश्‍न होताच. 

नोकरी करण्यापेक्षा आपण आपल्या पतीचा व्यवसाय पुढे नेला तर, हा विचार ललिता यांच्या मनात आला. परंतु कुटुंब, नातेवाईक, समाज परवानगी देईल का, हाही प्रश्‍न होताच. आपले कुटुंब आपल्यालाच चालवावे लागेल, त्यामुळे कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता घरातील सर्व कामे करून दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत त्या वर्धमाननगरात पानटपरी चालवतात. 
पुरुषांचा सदैव राबता असलेली पानटपरी चालविताना तुम्हाला त्रास होत नाही का, असा प्रश्‍न त्यांना विचारला असता, मला कुठल्याच अडचणी येत नाहीत, असे त्या हसत सांगतात. प्रत्येक ग्राहक वेगळा असतो. ते कसेही वागोत, आपण जर का दोन शब्द समजुतीचे सांगितले तर सारंकाही व्यवस्थित होतं, असेही त्या सांगतात. 

स्वतः कार्य करण्याचा आनंद वेगळाच
कुठलेही कार्य करण्यास महिलांनी लाज बाळगू नये. आपल्यावरील जबाबदाऱ्या आपल्यालाच पार पाडाव्या लागतात. एखादे कार्य तुम्ही किती आत्मविश्‍वासाने व स्वाभिमानाने करता, यावर सारंकाही अवलंबून असते. स्वतः कार्य करण्याचा आनंद वेगळाच असतो. 
ललिता मुकेश भारती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: success story about lalita bharti