अनेकींचे आयुष्य उजळविणाऱ्या मीनाताई

सुषमा सावरकर
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

नागपूर : स्वर्णलता रायकर यांचा कपडे व बॅग तयार करण्याचा एक छोटासा व्यवसाय होता. त्यांना प्रशिक्षण मिळताच त्यांनी मोठा व्यवसाय थाटला. सीमा पठाणे यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आता त्या एका कंपनीत "मार्केटिंग'चे काम करायला लागल्या. स्वर्णलता आणि सीमा यांच्यासारख्या असंख्य महिलांच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देण्याचे काम एक यशस्वीनी अविरत करीत आहे. त्यांचे नाव मीना पांडुरंग भागवतकर.

मीनाताई सांगतात. ""मी लहान होते, त्यावेळी माझ्या आईला प्रचंड तणावात मी बघायचे. चूक नसताना मार खाताना बघितले. कुटुंबात वडिलांना मिळते तेवढी प्रतिष्ठा आईला का मिळत नाही, अशी सल मनात घर करून होती. पुढे विवाह झाल्यानंतर असाच प्रकार इतरही महिलांसोबत घडताना मी बघितला. मग मात्र मी शांत बसले नाही. महिला सक्षम झाल्यातरच त्यांच्यावरील अत्याचार थांबू शकतो, याची खात्री पटली. त्यासाठी महिलांच्या सक्षमीकरणाचा लढाच मी उभा केला.''
मीनाताई उत्तर नागपुरात राहतात. या परिसरात बहुतेक घरे झोपडीवजा. मजूर, घर कामगार अशांची ही वस्ती. बहुतेक लोक अशिक्षित. अनेक जण दिवस-रात्र व्यसनात बुडालेली. तर अनेक गुन्हेगारीमध्ये लिप्त. या भागातील महिलांची स्थिती तर अत्यंत बिकट. व्यसनात बुडालेल्या नवऱ्यांकरिता बायको म्हणजे जणू बडवायचा ढोलच. अचानक एक दिवस पतीने घरातून मारहाण करीत घराबाहेर काढून दिलेली एक महिला मीनाताई यांच्याकडे आली. त्या महिलेला न्याय देण्याच्या जबर इच्छाशक्तीतून त्यांनी "उत्कर्ष फाउंडेशन'ची स्थापना केली.
महिलांना जोवर त्यांच्या हिताचे कायदे आणि अधिकार समजावून सांगत नाही, तोवर त्या अन्यायाविरुद्ध उभ्या राहू शकत नाहीत. पर्यायाने आर्थिकदृष्ट्या सक्षमही होऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांनी महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले. अनेकींना तर रोजगार मिळवण्यासाठीही सहकार्य केले. आजवर तब्बल पाच हजार महिलांना 150 प्रकारचे प्रशिक्षण दिले. त्या म्हणतात "फुल खुशियोंके बॉंटे सभीको, सब का जीवन ही बन जायें मधुबन'. महिलांना सर्वार्थाने प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सुरू केलेला त्यांचा हा प्रवास अनेकींचे आयुष्य उजळविणारा ठरला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: success story about meenatai