
शंकरबाबांनी या बालकाला स्वतःचे नाव देऊन आधारकार्ड, निवडणूक कार्ड, रहिवाशी दाखला काढून दिला. तो सहा वर्षांचा झाल्यानंतर त्याला स्वामी विवेकानंद अंध विद्यालयात दाखल केले. तेथे चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण अमरावतीतील नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात व परतवाडा येथील सुंदराबाई गोपालस्वामी विद्यालयात झाले.
अचलपूर (जि. अमरावती) : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आई-वडिलांनी टाकून दिलेल्या अंध मुलाला शंकरबाबा पापळकर यांनी पालकत्व देऊन त्याला विदूर नाव दिले. या विदूरने आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बीएसडब्ल्यूची पदवी प्राप्त केली. त्याची ही यशोगाथा ऐकून आदिवासी विभागाच्या मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी वज्झरच्या आश्रमात येऊन विदूरचा सत्कार केला.
विदूरला त्याच्या आई-वडिलांनी 23 वर्षांपूर्वी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात टाकून दिले होते. या अंध मुलाला बालकल्याण मंडळाच्या आदेशाने वज्झर येथील स्व. अंबादास वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहामध्ये आजीवन पुनर्वसनासाठी शंकरबाबा पापळकर यांच्या स्वाधीन करण्यात आले होते. शंकरबाबांनी या बालकाला स्वतःचे नाव देऊन आधारकार्ड, निवडणूक कार्ड, रहिवाशी दाखला काढून दिला. तो सहा वर्षांचा झाल्यानंतर त्याला स्वामी विवेकानंद अंध विद्यालयात दाखल केले. तेथे चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण अमरावतीतील नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात व परतवाडा येथील सुंदराबाई गोपालस्वामी विद्यालयात झाले. त्यानंतरचे शिक्षण त्याने बीएसपी महाविद्यालयात घेत बीएसडब्ल्यू ही समाजकार्य विषयातील पदवी प्राप्त केली.
क्लिक करा - विदर्भात ईथे आहे मुख्यमंत्र्यांचे आजोळ...
विदूरने मिळवली समाजकार्यात पदवी
ही बाब जेव्हा आदिवासी विभागाच्या मुख्य सचिव यांना माहीत झाली. त्या चिखलदरा शासकीय दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी वज्झर येथील आश्रमाला भेट दिली व विदूरच्या गळ्यात फुलांचा हार त्याचा सत्कार केला. सोबतच रोख पाच हजार रुपयांचा पुरस्कारादाखल देऊन विदूरचे कौतुक केले. दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही समाजकार्याची पदवी मिळवून विदूरने महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या इतिहासामध्ये एक गौरवाचे स्थान निर्माण केले. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने त्याचे अभिनंदन करते, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी बोलताना काढले. या वेळी शंकरबाबा पापळकर यांच्यासह आदिवासी विभागातील वरिष्ठ अधिकारी ठोके, उपसचिव शरद पाटील व विविध विभागांचे अधिकारी हजर होते.