एक पत्थर तो तबियत से उछालो यारों! त्या चौघांनी रोवला यशाचा झेंडा! वाचा त्यांची यशोगाथा

upsc
upsc

यवतमाळ : केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही अतिशय कठीण मानली जाते. त्यात ग्रामीण भागातील मुलांचा टिकाव लागत नाही. त्यासाठी दिल्लीत राहून कठोर परिश्रम घ्यावे लागतात. हा गैरसमज यवतमाळ जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांनी पुसून टाकला. यूपीएससीमध्ये यशस्वी झेप घेत जिल्ह्याचा झेंडा त्यांनी प्रशासकीय सेवेत रोवला. चौघांच्याही यशाने यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवी उर्मी जागली आहे.

अजरोद्दीन काजी (यवतमाळ), प्रज्ञा खंदारे (दिग्रस), अभिनव इंगोले (वणी), सुमित रामटेके (शिरपूर, वणी), अशी या गुणवंतांची नावे आहेत. यवतमाळ सातत्याने चर्चेत राहणारा जिल्हा. शेतकरी आत्महत्यांसाठी जागतिक पातळीवर ओळखला जातो. याच जिल्ह्यात आणि तेही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेले टॅलेंट बघून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला आहे.

मेट्रो सिटीत राहणाऱ्या मुलांना वेळेवर सर्व सुविधांसह योग्य वेळी मार्गदर्शन मिळते. ग्रामीण भाग त्यापासून कायम वंचित आहे. मात्र या विद्यार्थ्यांच्या यशाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नव्याने आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे चारही विद्यार्थी सामान्य कुटुंबातील आहेत.

यवतमाळ येथील अजरोद्दीन काजी यांनी ३१५ वी रॅंक मिळविली. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. त्यांच्या वडिलांनी कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी ऑटोरिक्षा चालविला. अजरोद्दीन यांनी २०१४ ते २०१८ या कालावधीत यवतमाळ येथेच कॉर्पोरेशन बॅंकेत शाखा प्रबंधक म्हणून कर्तव्य बजावले. आयएएस होण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नसल्याने नोकरीचा राजीनामा देत मार्च २०१८मध्ये दिल्ली गाठून युपीएससीचा अभ्यास सुरू केला आणि कठीण असा गड सर केला.

वणी येथील अभिनव इंगोले यांनी ६२४ वी रॅंक मिळविली. अभियांत्रिकीचे पदवीधर असलेले अभिनव यांनी मुंबई सिक्‍युरिटी एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडियात नोकरी करून हे यश मिळविले. त्यांचे वडील शिक्षक आहेत.

दिग्रस येथील प्रज्ञा खंडारे यांनी ७१९ वी रॅंक मिळविली. त्यांचे वडील शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. तर, आई शिक्षिका आहे. शेगाव येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळविली. त्या इंडियन रेल्वे अकाउंट सर्विसेसच्या माध्यमातून नांदेड येथे कार्यरत आहे. आयएएस किंवा आयआरएस याच सेवेत जायचे असे ठरवून यश मिळविले.

वणी तालुक्‍यातील शिरपूर येथील सुमित रामटेके यांनी ७४८ वी रॅंक मिळविली. वाराणसी आयआयटी येथून बी. टेक पदवी मिळविली. आपल्याला एकाच क्षेत्रात गुंतून पडायचे नाही. समाजासाठी काही तरी ठोस करायला हवे, या जाणिवेतून कुठेही नोकरी न करता नागपूर येथे राहून २०१५ पासून यूपीएससीची तयारी केली. २०१८ मध्ये यूपीएससीच्या माध्यमातून वर्ग एक अधिकारी म्हणून केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात निवड झाली. मात्र, सुमितने ही संधी नाकारली आणि आपले लक्ष्य पुन्हा अभ्यासावर केंद्रित करीत पाचव्या प्रयत्नात यूपीएससीत ७४८ वी रॅंक मिळविली. चौघांचाही यूपीएससीतील प्रवास प्रेरणादायी असा आहे.

चौघांचाही मंत्र एकच
ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही कमी नाहीत. कोणत्याही गोष्टींचा न्यूनगंड बाळगू नये. ध्येय ठरवून मेहनतीने त्याचा पाठलाग केल्यास यशापासून कुणीही रोखू शकत नाही. आम्ही यशस्वी होऊ शकतो, तर तुम्ही का नाही, असा मंत्र चौघांनाही दिला आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com