esakal | जमावबंदीची ऐसीतैसी 

बोलून बातमी शोधा

file photo

किराणा, अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध, औषधी, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बॅंक व पेट्रोलपंप आदि जीवनावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण जिल्ह्यातील 100 टक्‍के दुकाने बंद आहेत.

जमावबंदीची ऐसीतैसी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंदियाः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाउन स्थिती निर्माण झाली आहे. तसेच लोकांनी गर्दी करू नये, म्हणून जमावबंदी आदेशही जारी करण्यात आले आहेत. शासन, प्रशासनातर्फे कसोशीचे प्रयत्न सुरू असताना नागरिक मात्र, बेपवाईने वागताना दिसून आले. तथापि, शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणी, बैंक, रुग्णालय परिसरातील गर्दी पाहून जमावबंदीची ऐसीतैसी होताना दिसून आली. 

हे वाचा—विदर्भातील कोरोनाची परिस्थिती सुधारतेय, बाधितांच्या संख्येत झाली घट...

जमावबंदीचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी (ता.22) जिल्हावासीयांनी घरातच राहून स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यानंतर, कोरोना विषाणूंची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून घरीच बसण्याचे आवाहन करून जमावबंदी आदेश लागू केले. येत्या 31 मार्चपर्यंत जमावबंदी आदेश लागू असून, जिल्ह्यातील नागरिक घरीच राहून सहकार्य करतील. असे, वाटत होते. परंतु, शहरात लोकांची प्रचंड बेपर्वाई दिसून आली. रेल्वे, बसेस बंद असतानाही नागरिक घराबाहेर दिसून आले. 

रुग्णालयाजवळ गर्दी

एवढेच नव्हे, तर शहरात प्रवेश करणाऱ्या राज्य महामार्गावर अनेक खासगी वाहने गोरेगाव, आमगाव, बालाघाट मार्गावर सकाळी 9 वाजतापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत दिसून आली. येथील वैद्यकीय रुग्णालय जवळ ही हीच परिस्थिती होती. अनेक ठिकाणी पोलिस वाहन थांबवून त्याला घराबाहेर पडण्याचे कारण विचारत होते. दुसरीकडे अनेकजण खासगी वाहनांनी प्रवास करताना दिसले. शहरात जमावबंदी आदेशानंतरही रस्त्यांवर लोकांची वर्दळ दिसली. विशेष म्हणजे, कोरोना विषाणूंचा संसर्ग झपाट्याने पसरत चालला आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्यमार्गासह शहरी, ग्रामीण भागातील सर्व नगरपालिका, ग्रामपंचायती भागात सोमवारी (ता.23) पहाटेपासून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आली. तथापि, पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह ग्रामपंचायती भागात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले. त्यामुळे एकाच ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्‍तींना एकत्र येणार नाही. असे, निर्देश असताना मात्र, शहरात जमावबंदीची एैसीतैसी होताना दिसून आली. 

उल्लंघन केल्यास होणार कारवाई 

किराणा, अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध, औषधी, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बॅंक व पेट्रोलपंप आदि जीवनावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण जिल्ह्यातील 100 टक्‍के दुकाने बंद आहेत. एवढेच नव्हे, तर शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कामे 5 टक्‍के कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, अत्यंत महत्वाची कामे असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. अन्यथा घराबाहेर पडू नये. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.