अर्ध्यातच संपला ओडिशाच्या मजुराचा प्रवास, सहकाऱ्यांनी उसनवारी करून नेला मृतदेह

sudden death of odisha labaour in train journey
sudden death of odisha labaour in train journey

अमरावती : घराची ओढ असल्याने श्रमिक एक्स्प्रेसमध्ये बसून गावाकडे निघालेल्या परप्रांतीय मजुरांच्या वेदनांचा अंत कधी होणार? हा मुख्य प्रश्न उभा ठाकला आहे. रेल्वेने प्रवास करणा-या बिहारच्या मजुराच्या मृत्यूनंतर अठ्ठेचाळीस तासांत ओडिशाच्या मजुराचाही असाच मृत्यू झाला.

सुदर्शन भगवान आपट (वय ३०, रा. मंगलपूर, जि. गंजाम, ओरिसा), असे श्रमिक एक्स्प्रेसने प्रवास करताना मृत झालेल्या मजुराचे नाव आहे. सोमवारी (ता. २५) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे प्रवास अर्ध्यावरच सोडून सुदर्शनच्या मृतदेहासह त्याच्या तीन सहकाऱ्यांना बडनेरा रेल्वेस्थानकावर उतरणे भाग पडले. यापूर्वी शनिवारी (ता. २३) बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील मोहंमद आलम (वय ४२) या मजुराचा श्रमिक एक्स्प्रेसमध्ये मृत्यू झाला होता.

ओरिसा येथील सुदर्शन आपट अन्य तीन साथीदारांसह वर्षभरापूर्वी मोलमजुरीसाठी सुरत शहरात गेला होता. त्याठिकाणी एका कपडा मिलमध्ये त्यांना काम मिळाले. दोन पैसे हाती लागल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दर महिन्याला पैसे पाठविल्या जात होते, परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन सुरू होऊन रोजगार संकटात सापडला. काम बंद पडल्याने जेवढे पैसे होते ते संपले. सुदर्शन आपटसह त्याच्या साथीदारांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये आश्रय घेतला होता. गावी जाण्यासाठी ओरिसाच्या मजुरांनी केंद्र शासनाने सुरू केलेल्या श्रमिक एक्स्प्रेसने जाण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली होती. पण काळाला त्यांचा आनंददायी प्रवास कदाचित मान्य नसावा. सोमवारी (ता. २५) दुपारी दोन वाजता हे मजूर सुरत येथून श्रमिक एक्स्प्रेसमध्ये बसले.

गावातील असल्याने तिघेही एकाच डब्यात होते. प्रवासादरम्यान सुदर्शन आपट हा शौचालयात गेला अन् त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. अर्ध्या तासाने त्याचे सहकारी काय झाले हे बघण्यासाठी गेले असता त्यांना धक्काच बसला. ही श्रमिक एक्स्प्रेस रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास बडनेरा रेल्वेस्थानकावर थांबली. सुदर्शनचा मृतदेह प्लॅटफॉमवर काढून जीआरपी पोलिसांना माहिती दिली. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात ठेवला. मंगळवारी (ता. २६) उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नेण्यासाठी त्या मजुरांपुढे तसेच आर्थिक संकट निर्माण झाले. कारण ओडिशाला मृतदेह नेण्यासाठी त्यांना खासगी रुग्णवाहिका चालकाने ३५ हजार रुपये खर्च सांगितला. ओरिसा येथे राहणाऱ्या नातेवाइकांना सांगून भाड्याचे १८ हजार रुपये रुग्णवाहिका चालकाच्या खात्यात जमा केले. उर्वरित रक्कम त्याला ओरिसात मृतदेह पोहोचल्यानंतर देण्याचे ठरले.

सामाजिक दृष्टिकोन डोळ्यांपुढे ठेवून जिल्हा प्रशासनाने अशा संकटाच्या वेळी आपत्ती व्यवस्थापनासाठी आलेल्या फंडामधून मदत करायला हवी. प्रवासादरम्यान मृत्यू होणे ही दु:खदायी बाब आहे. अशा मजुरांच्या वेदना कमी करण्यासाठी मदत व्हायला हवी.
- नवनीत राणा, खासदार, अमरावती.

आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात अशा घटना घडल्यास महाराष्ट्र राज्यासाठी १०८ रुग्णवाहिकेची मदत संबंधितांना घेता येते. परप्रांतात मृतदेह पाठवायचा असेल तर प्रशासनाकडे तशी व्यवस्था नाही.
- मनोज लोणारकर, उपजिल्हाधिकारी, अमरावती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com