आर्थिक विवंचनेतून सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide attempts from financial distress

आर्थिक विवंचनेतून सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न

ब्रह्मपुरी : शहरातील देलनवाडी भागातील सहकार कॉलनी भागात भाड्याने राहणारे रमाकांत ठाकरे यांच्या कुटुंबाने आर्थिक बाबीला कंटाळून विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात पत्नी गीता रमाकांत ठाकरे यांचा मृत्यू झाला. वडील रमाकांत ठाकरे यांना ब्रह्मपुरीतील खासगी रुग्णालयात, तर मुलगा राहुल, मनोज यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. आता तिघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे. आर्थिक अडचणीमुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्यांनी बयाणात सांगितले.

शहरातील एका सदनिकेत ठाकरे कुटुंबीय वास्तव्यास आहे. घरात वडील रमाकांत ठाकरे, पत्नी गीता आणि मुलगा राहुल, मनोज राहतात. मागील काही दिवसांपासून रमाकांत ठाकरे यांच्या हाती काम नव्हते. दोन्ही मुले हे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असल्याचे समजते.शिक्षण घेऊनसुद्धा ते बेरोजगार होते. यामुळे घर चालविताना रमाकांत ठाकरे यांना कसरत करावी लागत होती. त्यांच्याकडे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे नव्हते.

घरी असलेले मोबाईल विकून त्यांनी घराचा खर्च चालविला असल्याची माहिती आहे. दोन ते तीन महिन्यांपासून फ्लॅटचे भाडे, वीजबिलही त्यांना भरता आले नाही. शनिवारी रात्री सगळ्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रात्रीच कीटकनाशक औषध आणत ते पिले. रविवारी (ता. २५) पहाटे रमाकांत शुद्धीवर आले. तेव्हा मुल जिवंत होते, तर पत्नी पडून दिसली. त्याच अवस्थेत रमाकांत ठाकरे यांनी सायकलने लहान भावाचे घर गाठले. त्याला या घटनेची माहिती दिली.

रमाकांतच्या भावाने लगेच आपल्या वाहनाने चारही लोकांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले.उपचारादरम्यान गीता ठाकरे यांचे निधन झाले. पती रमाकांत यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दोन्ही मुलांना गडचिरोलीला उपचारार्थ दाखल करण्यात आले. आता तिघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती माहिती पोलिस निरीक्षक रोशन यादव यांनी दिली. आर्थिक चणचण असल्याने त्यांनी विष प्राशन करून सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बयाणामध्ये सांगितले.