अतिपावसामुळे सडलेले पीक पाहून शेतातच प्राशन केले विष; आणि केला मुलाला फोन, पुढे...

प्रदीप बहुरूपी
Monday, 14 September 2020

तालुक्यातील वाडेगाव येथे कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून ५१ वर्षीय शेतकरी अरुण चरपे यांनी सायंकाळच्या सुमारास शेतातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

वरुड (जि. अमरावती)  : बेभरवशी निसर्गाचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसतो. कधी दुष्काळ तर कधी पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. सततच्या पावसामुळे गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.  यंदा सुरुवातीला पावसाने अतिशय चांगली साथ दिली. पीकही जोमात होते. परंतु आॅगस्टच्या मध्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही थांबायचे नाव घेत नाही.  त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. दिवसरात्र एक करून पिकवलेले शेत डोळ्यांसमोरच नेस्तनाबूत होत असल्याने शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहेत. अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीस आली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.   

क्लिक करा - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..
 

तालुक्यातील वाडेगाव येथे कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून ५१ वर्षीय शेतकरी अरुण चरपे यांनी सायंकाळच्या सुमारास शेतातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १२) सायंकाळी घडली.

अरुण तुळशीराम चरपे सायंकाळच्या सुमारास शेतात गेले होते. अतिपावसाने वाया गेलेले शेतातील पीक त्यातच कपाशीची देखील अवस्था बेकार असल्याने पिकांना लावलेला खर्चसुद्धा निघणार नाही, डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर, मुलीचे लग्न व चरितार्थ कसा चालवायचा, अशा बिकट मानसिकतेतून त्यांनी शेतातच विष प्राशन केले. नंतर त्यांनी याची माहिती मोबाईलवरून मुलाला दिली.

सविस्तर वाचा : योग्य आहार, सकारात्मक विचार कोरोनाला नक्की संपवतील, जाणून घ्या काय सांगतात राष्ट्रसंत...

यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी वरुड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारार्थ अमरावती येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अरुण चरपे यांच्यावर पीककर्जासह मुलांच्या शिक्षणाकरिता घेतलेले कर्ज असल्याचे सांगितले जाते. ते कर्ज पेरतफेडीची चिंता त्यांना गेल्या काही दिवसांपासून लागून असल्याची माहितीसुद्धा या वेळी नातेवाइकांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of a farmer in Wadegaon, poison take in his farm