दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

नागपूर : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने नदीत उडी घेऊन तर दुसऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. हे दुर्दैवी शेतकरी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत.

नागपूर : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने नदीत उडी घेऊन तर दुसऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. हे दुर्दैवी शेतकरी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील सावरगाव काळे (ता. नेर) येथील शेतकरी रामहरी शिनगारे (वय 67) यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रामहरी शिनगारे यांच्यावर बॅंकेचे दीड लाख रुपये व खासगी कर्ज होते. सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत होता. शासनाकडून विमा अथवा शेतकरी पेन्शन आली काय, हे बघण्यासाठी ते सिरसगावच्या बॅंकेत दररोज पायपीट करायचे. त्यांच्या नावे सहा एकर शेती आहे. आर्थिक अडचणीमुळे ते सतत विवंचनेत राहत होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी आहे.
दुसऱ्या घटनेत चंद्रपूर जिल्ह्यातील बरांज मो. (ता. भद्रावती) येथील बंडू मारुती मत्ते (वय 55) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून घरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना येथे सोमवारी (ता. 9) रात्रीच्या सुमारास घडली. बंडू मत्ते हे शेतीसोबतच जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. मागील वर्षी अतिवृष्टीने पिके नष्ट झाली. जनावरे खरेदी-विक्रीच्या व्यवसायातही फायदा होत नसल्याने कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते काही दिवसांपासून होते. सोमवारी रात्री त्यांनी घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर बॅंकेचे आणि सावकारी कर्ज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of two farmers