हाय रे कोरोना, बेरोजगारीला कंटाळून दोन युवकांनी संपविले जीवन

Suicide of two unemployed youths in three days in Vamanwadi
Suicide of two unemployed youths in three days in Vamanwadi

पुसद (जि. यवतमाळ) : तालुक्यातील जंगल कपारीत वसलेल्या चिमुकल्या वामनवाडीत तीन दिवसांत दोन बेरोजगार युवकांनी आत्महत्या केल्याने गावकरी सुन्न  आहेत. पंकजपाल महाराज यांच्या नेतृत्वातील 'सेवा फाउंडेशन'ने वामनवाडीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविले असतानाच बेरोजगार युवकांच्या आत्महत्यांमुळे या प्रकल्पाला धक्का बसला आहे.
 
वामनवाडीतील पंकज विलास घाडगे (वय २६) या बेरोजगार युवकाने गाव शिवारातील वालतूर तांबडे जंगलात झाडाला गळफास लावून सोमवारी (ता. २८) आपली जीवनयात्रा संपवली . पंकज आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांकडे तीन एकर शेती आहे. जंगलात बकऱ्यांचा चारा आणण्यासाठी दुपारी घरून गेला असता गावकऱ्यांना त्याचा गळफास घेतलेला मृतदेह पहावयास मिळाला.

दुसऱ्या घटनेत वामनवाडीतील मिलिंद अर्जुन ढोले (वय ३२) या अविवाहित युवकाने शुक्रवार ता. २५ रोजी घरीच विषप्राशन करून स्वतःला संपवले. हा युवक कोरोनाच्या लॉकडाऊन दरम्यान गावातच होता. हातांना काम नसल्याने विमनस्क अवस्थेत त्याला दारूचे व्यसनही जडले होते. बेरोजगार युवकांच्या या दोन्ही आत्महत्यांमुळे वामनवाडीतील वातावरण ढवळून निघाले आहे.

वामनवाडीची लोकसंख्या अवघी १९० एवढी असून बहुतांश शेतमजूर आहेत. हे गाव विकासापासून कोसो दूर असून भंडारी गटग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने नेहमी दुर्लक्षित राहिले आहे, अशा येथील नागरिकांच्या भावना आहे. गावातील युवक फार शिकलेले नसले तरी त्यांच्या हातांना काम नाही. पंकजपाल महाराज यांनी सेवा फौंडेशनच्या माध्यमातून या गावात व्यसनमुक्ती, स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, शिक्षणाची सुविधा, बेरोजगारांना रोजगार या मुद्द्यांवर गेल्या तीन वर्षापासून सातत्याने प्रबोधन केले आहे. त्यांच्या प्रयत्नातून गावकऱ्यांनी दारूही सोडली. 

परंतु कोरोनाच्या काळात बाहेरून आलेल्या काही व्यक्तींनी वालतुर तांबडे येथील दुकानात जाऊन दारू पिण्यास सुरुवात केली. वामनवाडीतील तरुणांना जॉब कार्ड देण्यासाठी पंचायत प्रशासनाला वेळोवेळी भेटी देण्यात आले. परंतु अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नसल्याची खंत गावकरी व पंकजपाल महाराजांनी व्यक्त केली. इतर सुविधांच्या बाबतीतही हाच प्रकार घडला. मुख्य म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत येथील बेरोजगार तरुणांना काम न मिळाल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. पोलीस पाटील किसन शेळके यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत प्रशासनाने काम उपलब्ध करुन दिले नाही असे सांगितले. मात्र, वनखात्याच्या नर्सरीची कामे उपलब्ध असताना येथील युवकांनी या कामांमध्ये रस घेतला नाही, अशी प्रतिक्रिया ग्राम विकास अधिकारी संजय हिंगाडे यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली .

शासकीय योजनांपासून उपेक्षित गाव

पुसदपासून २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगल कुशीतील वामनवाडी शासकीय योजनांपासून उपेक्षित आहे. गट ग्रामपंचायतमधील भंडारी, पिंपळगाव, पारध, लोभिवंतनगर या गावांमध्ये योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वामनवाडीत अजूनही पाणीपुरवठा योजना नाही. शाळा व अंगणवाडी डिजिटल करण्यात आली ती केवळ कागदावर. केवळ भिंती रंगविण्यात आल्या. मात्र कॉम्प्युटर सारखे साहित्य गायब आहे. नवयुवकांना जॉब कार्ड नाही. मजुरांची मनरेगाअंतर्गत नोंदणी नाही. हे प्रश्न अजूनही संपले नाहीत. याची खंत पंकजपाल महाराज यांनी व्यक्त केली. यापूर्वी वामनवाडीच्या समस्यांना 'सकाळ' मधून वाचा फोडण्यात आलेली होती.  विशेष म्हणजे त्यानंतर या गावाला पुसदच्या नगराध्यक्ष अनिता नाईक यांनी भेट दिली. ययाती नाईक यांनी निवडणुकीपूर्वी पंचायत समितीत प्रश्नही मांडले. परंतु हे प्रश्न अद्यापही कायम आहेत.

संपादन  : अतुल मांगे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com