काय हे... विदर्भात सूर्यफुलाची लागवड शून्यावर, का घेतला शेतकऱ्यांनी हा निर्णय...  

Sunflower cultivation in Vidarbha is low
Sunflower cultivation in Vidarbha is low

नागपूर  : बदलता काळ आणि मागणीनुसार पीक पध्दती बदलत असतात. काही वर्षांपूर्वी घेण्यात येणारी पिके कालांतराने बदलली जातात. सूर्यफुलासाठी प्रसिद्ध असलेल्या भागात लागवड कमी झाल्यामुळे बाजार समित्यांमधील या पिकाची उलाढाल ठप्प झाली आहे. विदर्भात सुमारे 300 हेक्टरवर सूर्यफुलाची लागवड होती. परंतु खरेदीदारांअभावी हे क्षेत्र आज शून्यावर आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पूर्व विदर्भातील नक्षलप्रवण गडचिरोली जिल्ह्याचे धान हे प्रमुख पीक. मात्र, याच जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांनी तेलबिया वर्गातील सूर्यफुलाचा पर्याय निवडला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सूर्यफूल लागवडीवर या भागातील शेतकऱ्यांचा भर होता. या भागात बाजारपेठ नसली तरी गडचिरोलीपासून १३५ किलोमीटर अंतर असलेल्या उमरेड बाजार समितीत सूर्यफुलाची विक्री केली जात होती. सरासरी 2500 रुपये क्विंटलचा दर सूर्यफूलाला मिळत होता.  

उमरेड बाजार समितीत साधारणत: पाच ते सहा वर्षे सूर्यफुलाची नियमित आवक होती.  चांगला दर मिळत असल्याने  नागपूर जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातही सूर्यफुलाखालील क्षेत्र वाढीस लागले. त्यावर आधारित मधमाशीपालनही शेतकरी करू लागले. त्यामुळे उमरेड बाजार समितीत सूर्यफुलाची आवक पाच हजार पोत्यांवर पोचली होती. मंगळवार, बुधवार, शनिवार असे तीन  दिवस या बाजार समितीत सूर्यफुलाची खरेदी होत असल्याचे सांगण्यात आले. परळी येथील व्यापारी सूर्यफूल खरेदी कामी महिनाभर याच परिसरात वास्तव्यास राहत होते. सूर्यफूलावर आधारित प्रक्रिया उद्योग त्या भागात असल्याने येथून खरेदी केलेला माल प्रक्रिया उद्योजकाला पुरविला जात होता. 

2016 पर्यंत होती नियमित आवक 


उमरेड बाजार समितीसोबतच अमरावती तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बाजार समितीत देखील सूर्यफुलाचे व्यवहार होत होते.  2016 पर्यंत सूर्यफुलाची आवक नियमित होती. त्यानंतर मात्र आवक मंदावली. परिणामी व्यापारीदेखील या बाजार समित्यांमध्ये फिरकेनासे झाले. लागवड क्षेत्र कमी झाल्याच्या परिणामी हे घडल्याचे सांगितले जाते. सद्यस्थितीत राज्यात केवळ हिंगोली जिल्ह्यातील एक बाजार  तसेच नंदुरबार बाजार समितीमध्ये सूर्यफुलाची आवक होत आहे. या भागातून गुजरातचे व्यापारी सूर्यफूल खरेदी करतात. 
 

व्यवहार पूर्णपणे ठप्प 
2016 पर्यंत बाजार समितीमध्ये सूर्यफुलाची नियमित आवक होती. महिनाभरात सरासरी पाच हजार पोत्यांची आवक असायची. परळी येथील व्यापारी या भागात खरेदीसाठी या भागात येत होते. उमरेडसोबतच खामगाव तसेच अमरावती बाजार समितीत सूर्यफुलाचे व्यवहार होते. पुढे आवक कमी झाल्याने व्यापारी बाजाराकडे फिरकेनासे झाले. आता सूर्यफुलाचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
- प्रकाश महातकर,
सचिव, बाजार समिती,  उमरेड, नागपूर


संपादन : अतुल मांगे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com