आश्चर्य : 474 मतदार निवडणार आमदार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

कमी कालावधीसाठी किती घोडे बाजारात उतरावयाचे, याची तयारीही केली जात आहे. सध्या तरी या जागेवर कोण उमेदवार असणार, हे निश्‍चित नसले तरी अनेक नावांची चर्चा नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये सुरू आहे.

यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम कधीही धडकण्याची शक्‍यता आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली असून, प्रारूप मतदारयादी निश्‍चित केली आहे. सध्यास्थितीत 477 मतदार असून, त्यातील तीन पदे रिक्त आहेत. त्यामुळे 474 मतदारांची यादी तयार झाली आहे.

अनेकांचा डोळा

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे सदस्य डॉ. तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी विधानसभा सदस्यांची शपथ घेतल्यानंतर विधान परिषद सदसत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे नवीन वर्षांत यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक लागण्याची शक्‍यता आहे. रिक्त झालेल्या या जागेवर अनेकांचा डोळा आहे. असे असले तरी केवळ तीन वर्षांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे अनेकांचा नकारही येत आहे. असे असले तरी यावेळी विधान परिषद निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसंदर्भात कधीही माहिती मागितली जाऊ शकते. पुढील कार्यक्रम लागण्याची शक्‍यता आहे. 

"जुळवा-जुळव'

अशास्थितीत वेळवर धावपळ होऊ नये म्हणून प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. प्रारूप मतदारयादी तयार करून प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. एकीकडे प्रशासनाची तयारी सुरू झाली असून, दुसरीकडे इच्छुकांचीही जोरदार तयारीची "जुळवा-जुळव' सुरू केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत कुणाचा "घोडे'बाजारात अधिक तेजीने धावतात, यावरच विजयाचे समीकरण अवलंबून असते. कमी कालावधीसाठी किती घोडे बाजारात उतरावयाचे, याची तयारीही केली जात आहे. सध्या तरी या जागेवर कोण उमेदवार असणार, हे निश्‍चित नसले तरी अनेक नावांची चर्चा नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये सुरू आहे. गेल्यावेळी बाहेरचा उमेदवार असल्याने "घोडे'बाजारात चांगले उतरले असले तरी तीन वर्षांत सदस्यांची कामे झाली नाहीत. परिणामी यंदा किमान जिल्ह्यातला उमेदवार असल्यास आपल्या अडीअडचणी मांडता येईल, असा सूर आहे. त्यामुळे यावेळी लढत कशी होणार, यावरच घोडे मैदानाचे चित्र अवलंबून आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चाच

यवतमाळ विधान परिषदेची निवडणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लढतील, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मात्र, सध्यातरी तशी शक्‍यता दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील उमेदवार या निवडणुकीत दंड थोपटणार, अशी चर्चा आहे. काहींच्या मते ऐनवेळी बाहेर जिल्ह्यातील उमेदवार रिंगणात येऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, येणारा उमेदवार कोण? याबाबत गुप्तता पाळली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surprise: 474 voters elect to MLC