esakal | वाघिणीचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

वाघिणीचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा अंदाज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धाबा (चंद्रपूर) : पोडसा (जुना) शेतशिवारात वाघीण मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूच्या चौकशीसाठी महाराष्ट्र-तेलंगणातील वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. मृत झालेल्या वाघिणीपासून काही अंतरावर मृत रानडुक्‍कर आढळून आले. शवविच्छेदनात वाघिणीच्या पोटात रानडुकराचे मांस होते. त्यामुळे रानडुकराच्या मासांत विषप्रयोग केला असावा, विषयुक्त मांस खाल्ल्याने तिचा मृत्यू झाल्याची शंका वनविभागाला आहे.
महाराष्ट्र-तेलंगण सीमेवर असलेल्या पोडसा(जुना) येथील चनकापुरे यांच्या शेतात मृत वाघीण आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र-तेलंगणातील वनविभागाच्या चमूने घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली आहे. वनविभागाच्या शोधमोहिमेत वाघाच्या मृत्यूस्थळापासून साधारणतः 200 मीटर अंतरावर रानडुकर मृतावस्थेत दिसून आले. रानडुकराच्या जवळच विषारी औषधांचे रिकामे पॉकिटे आढळून आलीत. त्यामुळे मृत रानडुकरावर विष प्रयोग केला असावा. विषारी मांस खाल्ल्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याची शंका वनविभागाला आहे. मृत वाघीण तीन वर्षांची होती, असे वनविभाग म्हटले. दरम्यान, घटनास्थळीच वाघिणीचे शवविच्छेदन करून जाळण्यात आले. यावेळी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रामाराव, मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, सहायक उपवनसंरक्षक विवेक मोरे, धाब्याचे वनपरिक्षेत्राधिकारी राऊतकर यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

वाघीण तेलंगणातील?
ज्या शेतात वाघीण मृतावस्थेत आढळून आली. त्या भागापासून जंगल जवळपास पाच किलोमीटर अंतरावर आहे. तेलंगणाची सीमा अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. चौकशीसाठी तेलंगणातील वनविभागाची टीम घटनास्थळी हजर झाल्याने वाघीण तेलंगणातील की महाराष्ट्रातील, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

loading image
go to top