परराज्यातील धान आढळून आले तर थेट कारवाई करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश

मिलिंद उमरे 
Friday, 25 December 2020

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राज्य शासनाने जाहीर केलेला बोनस तसेच दर मिळविण्यासाठी इतर राज्यांतून गैरमार्गाने धान मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परराज्यातील धान गैरमार्गाने जिल्ह्यात आणून शासकीय धानखरेदी केंद्रावर विकल्याचे आढळल्यास गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ते व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक व विभागीय आयुक्तांच्या आढावा घेताना बोलत होते. 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राज्य शासनाने जाहीर केलेला बोनस तसेच दर मिळविण्यासाठी इतर राज्यांतून गैरमार्गाने धान मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. आपल्या राज्यातील वाढीव दर आणि बोनसचा फायदा हा स्थानिक शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे. गैरमार्गाने येणाऱ्या धानावर तातडीने निर्बंध घालण्यासाठी प्रक्रिया राबवा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या. 

हेही वाचा - अटल बिहारी वाजपेयीनीं घेतला होता रामभाऊंच्या पाटोडीचा आस्वाद; नागपूरला अनेकदा दिली होती भेट

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यात याबाबत दक्षता घेण्यात येत असल्याचे सांगून यापुढे अशा गैरप्रकार करणाऱ्या व्यक्ती व वाहनांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच आंतरराज्य सीमांवर चेक पोस्ट लावणे, वाहनांची तपासणी करणे याकरिता लेखी आदेशही देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शासकीय धानखरेदी केंद्रावर जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांनाच बोनस दिला जाणार आहे. जवळच्या राज्यातून येणाऱ्या धानास कोणत्याही प्रकारे खरेदी करू नये, अशा सूचना प्रशासनाकडून लेखी स्वरूपात देण्यात आल्या आहेत असंही सांगण्यात आलंय. 

गडचिरोली जिल्ह्यात इतर राज्यांतून व इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या धानावर निर्बंध घालण्यासाठी प्रशासनाकडून तपासणी चेकपोस्ट उभारले जाणार आहेत. पोलिस, आरटीओ तसेच महसूल विभाग अशा वाहतूक करणाऱ्या वाहन व वाहन मालकांवर गुन्हे दाखल करणार आहेत. इतर राज्यांतून गैरमार्गाने धान वाहतूक करून जिल्ह्यात विक्री करण्यास बंदी आहे. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी आपले सातबारा तसेच बॅंकेचे तपशील अशा गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तींना देऊ नयेत, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

धान उत्पादक शेतकऱ्यांव्यतिरीक्त व्यापारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने संबंधित केंद्रावर धानविक्री करण्यासाठी आणल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर धानविक्रीकरिता येताना सोबत आधारकार्ड व चालू असलेले बॅंकेच्या बचतखात्याचे पासबुक व ज्यावर धानपिकाची नोंद आहे, असा चालू वर्षाचा सातबाराचा उतारा आणणे अनिवार्य राहील. 

Christmas 2020:  चर्चमध्ये केवळ ५० जणांनाच मिळणार परवानगी; नागपूर महापालिकेनं जारी केल्या मार्गदर्शक सूचना

बॅंक खात्यांचा तपशील देणं टाळा 

धान उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही खासगी व्यापारी, दलाल, मध्यस्थांची मदत न घेता थेट शासकीय खरेदी केंद्रावर धानाची विक्री करावी. तथापि, धान उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना खुल्या बाजार दरांनी धानाची विक्री केली असल्यास त्यांना चालू वर्षाचा नमुना सातबारा आणि बॅंक खात्यांचा तपशील देणे टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिंगला यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take strict action against rice crops said Ajit pawar marathi news