तळेगावच्या रॅंचोने टाकाऊ वस्तूंपासून बनविला एसी...पीपीई किट परिधान करणाऱ्या डॉक्‍टरांसाठी उपयुक्त

रूपेश खैरी
Monday, 27 July 2020

गौरव शर्माने निर्माण केलेल्या या वस्तूकरिता केवळ तीनशे रुपयांचा खर्च लागला आहे. थंडी हवा देणारे हे यंत्र त्याने घरातील टाकावू साहित्यातून बनविले आहे. हे यंत्र कपड्यात ठेवल्याने त्याचा उपयोग पीपीई किट वापरणाऱ्या डॉक्‍टरांना होणार आहे.

तळेगाव (शा. पं.) (जि. वर्धा) : गरज ही शोधाची जननी आहे. एखाद्याने संशोधनाच्या माध्यमातून एखादी चांगली वस्तू बनविली तर त्याचे कौतुकच केले जात आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णांना सेवा देत असताना डॉक्‍टरांना बराच त्रास सहन करावा लागतो. या डॉक्‍टरांकडून वापरण्यात येत असलेली पीपीई किट पूर्णत: बंद राहत असल्याने त्यांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. या डॉक्‍टरांसाठी वर्ध्यातील एक तरुण धावून आला. त्याने चक्‍क कपड्यात ठेवता येईल, असा एसी बनविला आहे. या तरुणाचे नाव गौरव शर्मा असून त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे.

त्याने निर्माण केलेल्या या वस्तूकरिता केवळ तीनशे रुपयांचा खर्च लागला आहे. थंडी हवा देणारे हे यंत्र त्याने घरातील टाकावू साहित्यातून बनविले आहे. मुळातच संशोधनात्मक वृत्तीच्या असलेल्या गौरवला लॉकडाउन असल्याने कुठे बाहेर फिरता येत नव्हते. त्याने घरीच या वस्तूची निर्मिती केली.

थंड हवा देणारे यंत्र

या यंत्राला रेडिएटर बसविले असल्याने ते थंड हवा देते. तसेच यामधून कोणताही व्हायरस हवेमार्फत शरीरात जात नाही. हे यंत्र वापरायला अत्यंत सहज असल्याने ते कपड्यात सहज ठेवता येते. यामधून येणारी हवा अगदी थंड असल्याने शरीर थंड ठेवण्यास मदत होते. याची बॅटरी तब्बल सात ते आठ तास चालत असल्याने हे शितयंत्र अत्यंत उपयोगात येऊ शकते, असे गौरव सांगतो.

गौरवने बनविली अनेक उपकरणे

गौरव याने या लॉकडाउनच्या काळात विविध प्रकारचे यंत्र टाकाऊ वस्तूपासून बनविले आहे. यामध्ये व्होल्टेज दर्शविणारी घड्याळ, स्वयंचलित धनुष्य, बुलेट आदींचा समावेश आहे. त्याच्या संशोधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गौरवने बनविलेल्या शितयंत्र यशस्वी झाले; तर कोरोनाच्या रुग्णसंपर्कात असलेल्या डॉक्‍टरांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.

हेही वाचा : व्वा रे पठ्ठे... मजूर मिळत नसल्याने तण काढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली ही शक्‍कल...

कोणताही व्हायरस आत शिरणार नाही
या यंत्रात एक रेडिएटर आहे. शिवाय एक पाण्याची छोटी बॉटल आहे. त्यात पाणी भरल्यास त्या रेडिएटरच्या साहाय्याने यात थंड हवा येते. हवा येण्यासाठी पाइपचा वापर केल्याने यातून कोणताही व्हायरस आत शिरणार नाही. एकदम छोट्या प्रकारात असलेले हे यंत्र कपड्यात कुठेही ठेवता येऊ शकते.
- गौरव शर्मा, वर्धा.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talegaons student making for low prises AC for doctors